डॉक्टर आणि ऍक्टर

होमिओपॅथीचा डॉक्टर असूनही अभिनयाचा कीडा डसलेला सुयोग गोऱ्हे… त्याला अंडरकव्हर एफबीआय एजंट साकारायची इच्छा आहे.

मूळचा नाशिकचा सुयोग गोऱ्हे होमिओपॅथीमध्ये डॉक्टर झालाय. तो बीएचएमएस आहे. पण अभिनयाची प्रचंड आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून अखेर त्याने अभिनय क्षेत्रात अखेर उडी घेतलीच. नाशिकमध्येच डॉक्टरेट पूर्ण केल्यावर चार पाच वर्षे नाटकांमध्ये काम केल्यानंतर सिनेमांसाठी तो ऑडिशन्स द्यायला लागला. त्याला छोटेमोठे रोल मिळाले, पण आता तो ‘कृतांत’मध्ये नायक साकारतोय. आजचे तरुण डॉक्टर व्हायला धडपडतात. पण बहुतेकांना डॉक्टर होता येत नाही. पण सुयोग मात्र डॉक्टर असूनही अभिनयाकडे वळला आहे. याबाबत बोलताना तो म्हणतो, प्रत्येक आईवडिलांप्रमाणेच माझ्याही आईवडिलांना वाटतं मुलाने स्थिरस्थावर व्हावं, आरामात खूप कमवावं… सिनेमात शाश्वती अशी नाहीच… मलाही ते पटलं. पण मी त्यांना म्हटलं, डॉक्टरकी मिळवतो, पण सिनेमांत प्रयत्नही करून पाहातो. नाहीच काही जमलं तर पुन्हा प्रॅक्टीस सुरू करेन. मग तेही मानले आहेत. आमच्या घरात पाचव्या पिढीतला मी डॉक्टर झालोय. आधीच्या सगळ्या पिढय़ांमध्ये सगळे डॉक्टरच आहेत. पण जेव्हा कधी नाशिकला घरी जातो तेव्हा वडिलांच्या क्लिनिकमध्ये माझी प्रॅक्टीस मी सुरूच ठेवतो.

पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो तेव्हा आपल्याला खूप भीती वाटली असं तो नम्रपणे सांगतो. तो म्हणतो, माझ्या करीयरचा श्रीगणेशा ‘गणपती बाप्पा मोरया’ या सिनेमापासून झालाय. कलर्स मराठी वाहिनीवर ती मालिका व्हायची. नाटकांत कामं केल्यामुळे त्या पहिल्या सीनलाही ओरडून डॉयलॉग बोलायला लागलो. मग दिग्दर्शकाने सांगितलं की, हे नाटक नाहीय, येथे नेहमीच्या आवाजातच बोलायचं. पण ती कॅमेऱ्याची भीती अजूनही कायमच आहे, असे त्याने स्पष्ट केले. महत्वाकांक्षा काय आहे? असं विचारता तो म्हणतो, मला अंडरकव्हर एफबीआय एजंट साकारायची इच्छा आहे. लहानपणापासूनच ते वाटतं. आजकाल भाषेला सीमा राहिलेल्या नाहीत. सिनेमा, मालिका, नाटकं किंवा अगदी वेबसिरीजमध्येही काम करायला संधी आहे, असं तो म्हणतो. शाहरुख खानचा चाहता असलेल्या सुयोगला अंडरकव्हर एजंट बनायला मिळालं तर छानच होईल.

चॉकलेट बॉय बनायचं सोडून कारकीर्दीच्या प्रारंभीच त्याने चक्क लग्न झालेल्या माणसाची भूमिका स्वीकारली. याबाबत बोलताना तो म्हणतो, मुळात मी अभिनय महत्त्वाचा मानतो. मग तो कसलाही असो. मी हेही करू शकतो हे दाखवून द्यायला मला आवडतं. याआधी ज्या ज्या भूमिका केल्यात त्या वेगळ्या प्रकारच्या होत्या. ‘शेंटिमेंटल’मध्ये एका तरुण बिहारी मुलाच्या भूमिकेत होतो. ‘बस स्टॉप’मध्ये कॉलेज तरुण साकारला. पण मला वाटतं, मोठय़ा वयाच्या रोलसाठीही माझा विचार होऊ शकतो हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या