
सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या संस्थेने तीव्र आक्षेप घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे निर्गुंतवणुकीकरण हा केवळ अविचारी नव्हे तर देशहितविरोधी निर्णय आहे, अशी टीका स्वदेशी जागरण मंचच्या राष्ट्रीय निमंत्रक अश्विनी महाजन यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर केली.
हरिद्वार येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मोदी सरकारने अलीकडेच एअर इंडिया, भारत पेट्रोलियम यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खरे मालक हे हिंदुस्थानातील नागरिक आहेत. खासगीकरणाच्या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे योग्य मूल्य नाकारले जात आहे. उलटपक्षी सरकारी कंपन्या विकत घेऊ पाहणाऱयांचेच अधिक भले करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप महाजन यांनी यावेळी केला.
हा राष्ट्रीय मालमत्ता हडपण्याचा डाव!
कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची योजना ही काही व्यावसायिक समूह आणि सनदी अधिकाऱयांच्या संगनमताचा परिपाक आहे. राष्ट्रीय मालमत्ता हडपण्याचा हा डाव आहे. यात देशाचे हित नाही. त्यामुळे याला विरोध करून राष्ट्रीय मालमत्तांचे रक्षण करण्याची हीच वेळ आहे, असे महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांनी आधीच खासगीकरणाविरोधात उभारलेल्या मोहिमेला बळ मिळणार आहे.
























































