याला जीवन ऐसे नाव…मनाने तरुण असलेल्या ज्येष्ठांची ‘स्वामी’ संस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार,

किसी का दर्द मिल सके तो ले उधार,

किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है…

‘अनाडी’ चित्रपटातील गाण्याच्या या ओळी सर्वार्थाने सार्थ ठरविणारी सामाजिक संस्था म्हणजे ‘स्वामी.’ गेली 17 वर्षे ही संस्था अनेक गरजूंना तसेच रुग्णांना मदतीचा हात देत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. सामाजिक बांधीलकीचा वसा घेऊन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रात मोलाचे कार्य करीत आहे.

समाजकार्याची आवड उपजतच असली की, मग त्याला वयाचे बंधन आडवे येत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही संस्था. कारण तन, मन, धन आणि अमूल्य वेळ देऊन संस्थेसाठी झटणारे संस्थेचे कार्यकर्ते हे मनाने तरुण असलेले ज्येष्ठ आहेत. याविषयी अध्यक्ष सुरेश लाड यांनी सांगितले की, ‘‘आम्ही सर्व ज्येष्ठ ‘समाजसेवा प्रशिक्षण कोर्स’ पूर्ण केलेले माजी विद्यार्थी आहोत.  2006 मध्ये समाज सेवेचे व्रत अंगीकारत आम्ही ‘स्वामी’ (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायर्नमेंट) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत आम्ही लालबाग, परळ या गिरणगावातील गरजू लोकांना तसेच केईएम, टाटा, वाडिया रुग्णालयांमधून उपचार घेत असलेल्या रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.’’

‘समाज सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य असलेली ही संस्था ‘रुग्णसेवा पेंद्रां’तर्गत रुग्णांना उपयोगी पडणारी सर्व प्रकारची उपकरणे अल्पदराने भाडय़ाने उपलब्ध करून देते. तसेच ‘मातृभाव’ या उपक्रमामार्फत प्रत्येक शनिवारी
पॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धान्य वाटप करते.

‘पॅथॉलॉजी’ हा उपक्रम राबविताना विभागातील गरीब, गरजू रुग्णांच्या रक्त आणि इतर चाचण्या माफक दरात केल्या जातात, तर ‘औषध पेढी’मार्फत घरात शिल्लक राहिलेली औषधे कालबाह्यता तारीख पडताळून आदिवासी विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना मोफत पोहचविली जातात. तसेच आदिवासी पाडय़ातील महिलांना बी-बियाणे देऊन वृक्षारोपण करण्यात येते.  वृक्षारोपण, प्लॅस्टिक बंदी असे कार्यक्रम  राबवले जातात.

कोणत्याही जात, धर्म आणि राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसलेले विविध समाजोपयोगी उपक्रम संस्था राबविते. यातीलच एक म्हणजे ‘विद्यार्थी सहाय्य योजना.’ या उपक्रमांतर्गत दरवर्षी 450 ते 500 विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू दिल्या जातात. संस्था सध्या भाडय़ाच्या जागेत कार्यरत असून त्यांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे जागेसाठी प्रस्ताव मांडला आहे, अशी माहिती लाड यांनी दिली.

संस्थेने 2013 साली ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘विरंगुळा पेंद्र’ सुरू केले असून याअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातात. ‘व्हीपह्रऑर्गन्स फाऊंडेशन’ आणि ‘स्वामी’ यांच्या संयुक्त विद्यमाने अवयव दान, देहदान चळवळ सुरू आहे.

>> अनघा सावंत