स्वप्नील अन् प्रसादचा गोडवा

अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी आपल्या मिश्कील स्वभावाने मनोरंजनाचा गोडवा कायमच वाढवला आहे. सध्या मात्र हे दोघेही ‘जिलबी’चा मनमुराद आस्वाद घेत तिचा गोडवा चाखतायेत. शूटिंगदरम्यान ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत या दोघांनी जिलबीवर येथेच्छ ताव मारला आणि हो… ही ‘जिलबी’ ते प्रेक्षकांनाही देणार आहेत.

आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती असलेला ‘जिलबी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे आहेत. चित्रीकरणाच्या वेळी धमाल जिलबीचा आस्वाद घेण्याचा मस्त बेत या दोघांनी नुकताच केला. केवळ प्लॅन करून हे दोघे थांबले नाहीत, तर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एक मजेशीर व्हिडीओ या दोघांनी बनवला.

स्वप्नील आणि प्रसाद हे दोघेही ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोन गोड माणसे एकत्र आल्यावर चित्रपटाचा ‘गोडवा’ नक्कीच वाढणार असे दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी सांगितले. शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.