तारा राणीच्या भूमिकेत दिसणार स्वरदा ठिगळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतील ताराराणीची भूमिका कोण साकारणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागली होती. मात्र या भूमिकेत स्वरदा ठिगळे दिसणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत. ‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. या भूमिकेसाठी राज्यभरातून नामवंत अभिनेत्रींपासून नवोदित अभिनेत्रांपर्यंत अनेकजणी सहभागी झाल्या होत्या. त्यात स्वरदा ठिगळे या अभिनेत्रीची निवड ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी करण्यात आली आहे.

स्वरदाने अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून हा इतिहास सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे.