स्वस्तिक क्रीडा मंडळाची हॅटट्रिक, महिलांमध्ये डॉ. शिरोडकरचा दबदबा

श्री मावळी मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 72 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली, तर महिला विभागात मुंबई शहरच्या डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने शिवशक्तीवर मात करत आपला दबदबा दाखवला.

ठाण्यात कबड्डी आयोजनात सर्वात जुने आणि प्रसिद्ध असलेल्या श्री मावळी मंडळाच्या कबड्डी महोत्सवात पुरुष गटाच्या अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत स्वस्तिकने प्रथमच सहभागी झालेल्या पुण्याच्या सतेज संघ, बाणेर या संघाची कडवी झुंज 33-30 अशी मोडीत काढली.

मध्यंतराला स्वस्तिकने आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतर सतेजच्या मनोज बांद्रेने प्रत्येक चढाईत गुण घेत संघाला आघाडीवर नेले. सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना त्याने सामना 24-27 अशा गुणांवर आणला. सामन्याची शेवटची पाच मिनिटे अक्षरशः श्वास रोखायला लावणारी होती. शेवटची तीन मिनिटे असताना स्वस्तिकने सतेजच्या मनोज बांद्रेची अचूक पकड केली. तीच शेवटी निर्णायक ठरली. येथूनच पुढे सतेजची सामन्यावरील पकड सुटली आणि स्वस्तिकची सामन्यावरील विजयाची पकड अधिक घट्ट होत गेली. शेवटी स्वस्तिक क्रीडा मंडळाने 33-30 गुणांनी शानदार विजय मिळवला.

महिला गटातही मुंबई शहरच्याच डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब आणि शिवशक्ती महिला संघ यांच्यात जेतेपदाचा संघर्ष रंगला. डॉ. शिरोडकरने ही चुरशीची लढत अखेर 26-21 गुणांनी जिंकून विजेते पदाला गवसणी घातली. या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीला काहीसा सावध पवित्रा घेतल्यामुळे या संथ सामन्यात विश्रांतीला दोन्ही संघ 9-9 अशा बरोबरीत होते. मात्र त्यानंतर खेळात वेगाने आणि थराराने प्रवेश केला. पूजा यादवने तुफानी चढाया करत शिवशक्तीला आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडून शिरोडकरच्या कशिश पाटील, मेघ कदमने सातत्याने गुणांची कमाई करून संघाला विजयी ट्रकवर ठेवले. शेवटची तीन मिनिटे बाकी असताना शिरोडकरच्या दोघींनी पूजा यादवची पकड करत शिरोडकरचा विजय निश्चित केला.