स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेसाठी तिघा अभिनेत्यांमध्ये चुरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात मोलाचे योगदान देणाऱया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनप्रवासावर भव्यदिव्य चित्रपटाची निर्मिती होत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे या बायोपिकचे नाव असून त्याचे लेखन-दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात मुख्य भूमिका कोण साकारणार याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.

वीर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी सशक्त अभिनेत्याची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती आयुष्मान खुराणा, रणदीप हुडा आणि राजकुमार राव या अभिनेत्यांच्या नावाला आहे. हे तिघेही आजच्या पिढीतील दमदार अभिनेते आहेत. आपल्या भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घेण्याची आणि शारीरिक बदल घडवण्याची त्यांची तयारी असते.

‘सरबजीत’साठी रणदीपने 20 दिवसांत 18 किलो वजन कमी केले होते. राजकुमार आणि आयुष्मान यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांचे खूप कौतुक झाले आहे. त्यामुळे निर्माते या तिघांपैकी मुख्य भूमिकेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.