
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, काही हिंदुस्थानींकडून परदेशातील कायद्याचे आणि सभ्यतेचे पालन करण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. हेच कारण पुढे करत स्वित्झर्लंडमधील हॉटेलने हिंदुस्थानी पर्यंटकांसाठी आचारसंहिता जारी केली आहे. याबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. अशी आचारसंहिता जारी करून हिंदुस्थानी पर्यंटकांची प्रतिमा मलीन करण्यात येत असल्याने याविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. उद्योगपती आणि आरपीजी समुहाचे अध्यक्ष हर्ष गोंयका यांनी या आचारसंहितेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
Reading this notice I felt angry, humiliated and wanted to protest.
But a realisation dawned that we as tourists are loud, rude, not culturally sensitive. With India becoming an international power, our tourists are our best global ambassadors. Let’s work on changing our image! pic.twitter.com/7R4ZrZIXKi— Harsh Goenka (@hvgoenka) July 22, 2019
स्वित्झर्लंडमधील जीस्टैड हॉटेलने हिंदुस्थानी पर्यटकांसाठी एक नोटीस जारी करत आचारसंहितेतील नियम आणि कायदे स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन करत हिंदुस्थानी पर्यटकांनी सुटीचा आनंद घ्यावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसवर हॉटेलचे व्यवस्थापक क्रिस्टीन मॅट्टी यांची स्वाक्षरी आहे. या नियमावलीत हिंदुस्थानी पर्यटकांनी नाश्ताच्या टेबलवरून कोणतीही वस्तू स्वतःसोबत नये. या टेबलवरच बसून त्यांनी नाश्ता करावा. येथील कोणतीही वस्तू आपल्यासोबत नेऊ नये. येथील पदार्थ फक्त नाश्तासाठी आहेत, याची नोंद घ्यावी. पर्यटकांना लंच बॅग हवी असल्यास त्यांनी हॉटेल प्रशासनाकडे मागणी करावी. त्याचे योग्य पैसे भरून ती खरेदी करावी, असे म्हटले आहे. तुमच्यासोबत इतर पर्यटकांनाही नाश्ताचा आणि जेवणाचा आनंद घ्यायचा आहे, याचे भान ठेवा. त्यामुळे याठिकाणी ठेवलेल्या भाड्यांचाच वापर करावा, स्वतःकडील भांडी येथे वापरू नयेत किंवा त्या भांड्यामध्ये येथील पदार्थ भरून नेऊ नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहेत. हिंदुस्थानी पर्यटकांना शांतता पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तुमच्यासोबतच या हॉटेलमध्ये देश-परदेशातील अनेक पर्यटक आलेले आहेत. त्यांना शांतता हवी आहे. त्यामुळे हॉटेलमधील शांतता राखण्यात यावी, कॉरिडॉर आणि गॅलरीत गोंधळ घालू नये, तसेच मोठ्या आवाजात बोलू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
फक्त हिंदुस्थानी पर्यटकांसाठी जारी करण्यात आलेल्या या नोटीसचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या नोटीसमुळे हिंदुस्थानी पर्यटकांची प्रतिमा मलीन झाली असून त्यांचा अपमान करण्यात आल्याचे हर्ष गोंयका यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानी पर्यटक खूप खातात. असभ्य वर्तन करतात. शांतता पाळत नाही असा समज पसरत असल्याचेही ते म्हणाले. हिंदुस्थानी पर्यटकांनीही परदेशात नियमांचे पालन करावे, देशाची आणि हिंदुस्थानींची प्रतिमा मलीन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गोंयका यांच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट करत सहमती दर्शवली आहे. मात्र, काही हिंदुस्थानी नियमांचे पालन करत नसल्याकडेही अनेकांनी लक्ष वेधले आहे. हॉटेलने अशा प्रकारची नोटीस लावणे वंशवादी असल्याची टीकाही अनेकांनी केली आहे.
























































