नैराश्य म्हणजे काय? काय असतात लक्षणे? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह रजपुत हा गेले काही महिने नैराश्याच्या गर्तेत होता. त्यातच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. आजही आपल्याकडे नैराश्याबाबत फार गांभीर्य नाही. हा आजार कुणालाही होऊ शकतो, हा आजार मानसिक असल्याने त्याच्या जखमा जरी दिसत नसल्या तरी त्या खोल असतात. हा आजार उपचार आणि समुपदेशानेही बरा होतो

नैराश्य म्हणजे नेमकं काय?

जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात, वातावरण नकारात्मक होते, भविष्यात चांगल्या गोष्टी घडणार नाही, माझ्यात चांगले गुण नाही, असे विचार सतावतात  म्हणजेच नैराश्य.  नैराश्यामुळे आत्महत्येचे विचारही बरेचदा मनात घोंघावू लागतात.

नैराश्याबद्दल गैरसमज  

मनाचा कुठलाही आजार झाला की तो व्यक्ती मनोरूग्ण, वेडा आहे असा मोठा गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. तसेच, अशा व्यक्तीला उपचारांची गरज नाही, चांगले विचार केले की तो आपोआप बरा होईल, असे समजले जाते. त्यामुळे सहसा रुग्ण मनोचिकित्सकाकडे जात नाही.  त्यामुळे 14 दिवसांपेक्षा जास्त मन उदास असेल तर ती व्यक्ती नैराश्यात आहे, असे समजावे.

नैराश्यामागे कोणती प्रमुख कारणे आहेत?

नैराश्याची बरीच कारणे आहेत. अनुवंशिक संवेदनशीलता आणि आपला मूळ स्वभाव हे दोन घटक बर्‍यापैकी नैराश्याला कारणीभूत ठरतात.  या दोन घटकांमुळे आपल्यात ताणतणाव सहन करण्याची क्षमता निर्माण होत असते आणि ही क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. नोकरी गेल्याचा ताण, लग्न मोडल्याचा किंवा प्रियकर सोडून गेल्याचा ताण, जवळची व्यक्ती मृत पावली असेल तर त्यामुळे निर्माण होणारा ताण सहन करण्याची प्रत्येक संवेदनशील व्यक्तीची क्षमता असेलच, असे नाही. त्यामुळे ती उदास व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत जाऊ शकते.

नैराश्याबद्दल जागृकता

सर्वसामान्य आजारांपैकी नैराश्य हे तिसर्‍या क्रमांकावर असून आजही ग्रामीण भागात याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. नैराश्यावरील उपचारांपेक्षा बुवाबाजीकडे लोकांचा अधिक कल दिसून येतो. त्यात ग्रामीण भागात प्राथिमक उपचारांची वानवा असून मानसोपचार तज्ज्ञही नाहीत. त्याचबरोबर मानसोपचार आणि औषधांचा खर्च ग्रामीण नागरिकांना परवडलेच असे नाही आणि परवडलाच तर त्यांना औषधं उपलब्ध होतीलच, याची शाश्‍वती नाही.

नैराश्यावरील उपचार कोणते?

नैराश्यावर औषधं, समुपदेशन, योग्य दिनचर्या, संवाद असे चार प्रमुख उपाय आहेत. 50 टक्के आजार औषधांनी आणि 50 टक्के आजार इतर गोष्टींमुळे बरा होतो. पोषक आहार घेणे, लोकांशी संवाद साधणे आणि आरोग्दायी दिनर्येचे पालन केल्यास व्यक्ती नैराश्यातून बाहेर येऊ शकते.