
सामना ऑनलाईन,मुंबई
मुंबईची 18 वर्षीय धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज सध्या विंडीजमध्ये टी-20 चा वर्ल्डकप खेळत आहे. तिने आपल्या कारकीर्दीतील या पहिल्याच वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले आहे. पदार्पणातच सलामीचा सामना तिने गाजवला. या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शानदार अर्धशतक झळकवले. विश्वचषकात अर्धशतक साजरे करणारी जेमिमा ही सर्वात युवा फलंदाज ठरली. आपल्या खेळात अधिक आक्रमकता यावी यासाठी जेमिमाने चक्क मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा कसून सराव केला आहे.
मुंबईकर जेमिमाने विंडीजमधील टी- 20 विश्वचषकाच्या तयारीसाठी वांद्रे येथील एमआयजी क्लबमधील मुलांसोबत खास सराव केला. मुलांच्या गोलंदाजीवर तिने कसून सराव केला. याच मेहनतीचे फळही तिला सलामीच्या सामन्यात मिळाले. यासाठी घेतलेल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर तिने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकले. मुंबईच्या उपनगर परिसरातील भांडुपमध्ये 5 सप्टेंबर 2000 मध्ये जेमिमाचा जन्म झाला. तिचे वडील इवान रॉड्रिग्ज हेही क्रिकेटपटू होते. ते तिला वांद्रे येथील क्लबमध्ये क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊ लागले. यामुळे तिने लहानपणापासूनच आपले दोन्ही भाऊ आणि वडिलांसोबत क्रिकेटचे धडे गिरवले. यादरम्यान तिला आईचीही मोलाची साथ मिळाली. तिची आई लविता या न्यूट्रीशन आणि डाएटवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच जेमिमाला सातत्याने आपला फिटनेस कायम ठेवता आला.
यशस्वी कामगिरी
- 2013 – साडेबाराव्या वर्षी मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात निवड.
- 2014 – 17 वर्षांखालील मुंबई हॉकी संघात.
- 2016 – मुंबईच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाची कर्णधार व हॉकी संघात निवड.
- 2017 – मुंबईकडून सौराष्ट्रविरुद्ध शानदार द्विशतक. 19 वर्षांखालील स्पर्धेत 1013 धावा, 19 विकेट.
- 2018 – हिंदुस्थानकडून वन डे व टी-20 मध्ये पदार्पण. आता वयाच्या 18 व्या वर्षी वर्ल्डकप खेळत आहे.
























































