
सलामीच्या लढतीत स्कॉटलंडकडून पराभवाची नामुष्की पत्करावी लागलेल्या वेस्ट इंडीजने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या पात्रता लढतीत झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव करीत विजयाचे खाते उघडले. 16 धावांत 4 विकेट घेणारा अल्झारी जोसेफ या सामन्याचा मानकरी ठरला.
जोसेफ, होल्डरची अचूक गोलंदाजी
वेस्ट इंडीजकडून मिळालेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोसेफ अल्झारी व जेसन होल्डरच्या अचूक गोलंदाजीपुढे झिम्बाब्वेचा डाव 18.2 षटकांत 122 धावांत गडगडला. त्यांच्याकडून सलामीवीर वेस्ली मधेवरे (27) व लूक जोंगवे (29) यांनी धावांची विशी ओलांडली, तर कर्णधार रेजिस चकाब्वा (13), सीन विल्यम्स (14) व रायल बर्ल (17) हे दुहेरी धावा करणारे इतर फलंदाज ठरले. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर जेसन होल्डरने 3 विकेट घेत जोसेफला साथ दिली. अकिल हुसैन, ओबेड मकॉय व ओडीन स्मिथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
विंडीजच्या फलंदाजीला बहर नाही
दरम्यान, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 7 बाद 153 धावसंख्या उभारली. अनेक स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या स्वारीवर आलेल्या विंडीजची फलंदाजी अद्याप बहरलेली दिसत नाहीये. त्यांच्याकडून जॉन्सन चॅर्लेसने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. रोवमन पॉवेल (28) व अकिल हुसैन (नाबाद 23) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने 3 फलंदाज बाद केले. ब्लेसिंग मुझरबानीने 2, तर सीन विल्यम्सने एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
– वेस्ट इंडीज ः काईल मिल्स 13, जॉन्सेन चार्लेस 45, रोवमन पॉवेल 28, अकि हुसैन नाबाद 23; अवांतर ः 17, एकूण ः 7 बाद 153 धावा. गोलंदाजी ः ब्लेसिंग मुझरबानी 38/2, सिकंदर रझा 19/3, सीन विल्यम्स 17/1.
– झिम्बाब्वे ः वेस्ली मधेवरे 27, रेजिस चकाब्वा 13, सीन विल्यम्स 14, रायल बर्ल 17, लूक जोंगवे 29; अवांतर ः 11, एकूण ः 18.2 षटकांत 122 धावा. गोलंदाजी ः अल्झारी जोसेफ 16/4, जेसन होल्डर 12/3.



























































