वेध टी-20 वर्ल्ड कपचे; रोहितसह 7 खेळाडू शनिवारी अमेरिकेला जाणार

आगामी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपसाठी कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाचे 7 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहेत. संघातील उर्वरित खेळाडू 26 मे रोजी होणाऱ्या आयपीएलच्या फायनलनंतर रवाना होतील. याआधी, आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफसाठी पात्र न ठरलेल्या संघांतील खेळाडू 21 मे रोजी टी-20 वर्ल्ड कपसाठी रवाना होणार होते. मात्र, त्यानंतर या वेळापत्रकात बदल करून 25 मे तारीख ठरविण्यात आली आहे.

कर्णधार रोहित शर्मासह हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल व इतर सपोर्ट स्टाफ पहिल्या टप्प्यात न्यूयॉर्कला रवाना होतील. एक जूनला टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेत एक सराव सामना खेळणार आहे. 24 मे रोजी दुसरा फ्ले ऑफ सामना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला चमू वर्ल्ड कपच्या स्वारीवर रवाना होईल.

आयपीएल जेतेपदाचा आनंदही लुटता येणार नाही

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेची फायनल खेळणारे हिंदुस्थानी खेळाडू 27 मे रोजी अमेरिकेला रवाना होतील. त्यामुळे वर्ल्ड कप संघात समावेश असलेल्या हिंदुस्थानी खेळाडूंना आयपीएल जेतेपदानंतर जल्लोषही साजरा करण्याची संधी मिळणार नाहीये. कारण दुसऱ्या दिवशी लगेच हिंदुस्थानी संघातील खेळाडू वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होतील. हिंदुस्थानी संघ टी-20 वर्ल्ड कपपूर्वी अमेरिकेत १ जूनला बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामना खेळणार आहे. त्याआधी, टीम इंडिया अमेरिकेत तीन ते चार सत्रांत सराव करून वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील.