T20 World Cup 2024 : ‘या’ दोन फिरकीपटूंमध्ये चुरस, कोणाला मिळणार विश्वचषकाचे तिकीट?

आगामी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड या महिन्याच्या अखेर पर्यंत करण्यात येणार आहे. विश्वचषकासाठी कोणाची निवड होणार, कोणाची नाही यावरून तर्कवितर्क लावले जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये खेळाडूंची नावे जाहीर होतील. मात्र टीम इंडियाच्या दोन फिरकीपटूंमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये दोघांनीही आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावीत केले आहे.

आयपीएलचा सतरावा हंगाम आता ऐन भरात आला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंनी धमाकेदार प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे निवड समीतीपुढे मोठी समस्या निर्माण झाली असून कोणाची निवड करायची आणि कोणाची नाही? हा मोठा प्रश्न निवडकर्त्यांना पडला आहे. चाहते आणि क्रिडा विश्लेषकांनी आपआपली टीम बनवायला सुरुवात केली आहे. मात्र निवड समितीपुढे काही समस्या आहेत. जसे की रोहित शर्माच्या सोबतीला दुसरा सलामीवीर कोण असणार? यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांची नावं सध्या चर्चेत आहेत. मात्र निवड कोणची होणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. मात्र तीघांपैकी दोन यष्टीरक्षकांची निवड निश्चीत आहे.

फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवच्या व्यतिरिक्त दोन नावं सध्या चर्चेत आहेत. युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दोघेही सध्या आयपीएल खेळत असून चांगल्या लयीत दिसत आहेत. अनुभवाचा विचार केला तर युजवेंद्र चहलकडे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. मात्र रवी बिश्नोई अनुभवाच्या बाबतीत थोडा मागे आहे. बिश्नोईने आयपीएलमध्ये आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांना प्रभावित केल आहे. तर युजवेंद्र चहलने पाच सामन्यांमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. असे असले तरी दोघांपैकी एकाचीच निवड वेस्ट इंडिजमध्ये रंगणाऱ्या विश्वचषकासाठी होणार आहे.