
वन डे वर्ल्ड कप गमावल्यानंतर बीसीसीआयने आता आगामी टी-20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित केले आहे. बीसीसीआयने संघाची चाचपणीदेखील सुरू केली आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट-रोहीत जोडीने खेळावे अशी आशा बीसीसीआय बरोबर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केली आहे. मात्र विराट गेल्या एक वर्षापेक्षा अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय टी-20 पासून अंतर ठेवून असल्याने तो वर्ल्ड कपमध्ये खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. टी-20 वर्ल्ड कपचे द्वार रोहितप्रमाणे विराट कोहलीसाठीही खुले आहेत. खेळायचे की नाही याचा सर्वस्वी निर्णय त्याच्याचकडे सोपविण्यात आला. तो खेळला तर हिंदुस्थानच्या डावाला बळकटी मिळेल, पण तो नाहीच खेळला तर त्याच्या जागी पर्याय शोधण्याची बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. विराटच्या जागी इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
वन डे वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना गमावल्यानंतर बीसीसीआयने 4 जून 2024 पासून सुरू होणाऱया टी-20 वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे. टी-20 वर्ल्ड कपचीच तयारी म्हणून हिंदुस्थानने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 आणि आफ्रिकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्याचे नियोजन केले, मात्र या दोन्ही मालिकांपासून विराट आणि रोहितने दूर राहणे पसंत केले आहे. 2022 मध्ये टी-20 विश्वचषकात पराभव झाल्यानंतर विराट आणि रोहित हिंदुस्थानच्या टी-20 संघात पुन्हा दिसेल नाहीत. मात्र वन डे वर्ल्ड कपमधील विराट आणि रोहितचा फॉर्म पाहता त्यांनी आगामी टी-20 वर्ल्ड कप खेळून हिंदुस्थानला विजेतेपद मिळवून द्यावे, अशी इच्छा अनेक दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केली आहे.
गेल्या एक वर्षापासून टी-20 पासून दूर राहिलेल्या विराटने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळून हिंदुस्थानची फलंदाजी मजबूत करावी अशी आशा बीसीसीआयने व्यक्त केली. मात्र विराट टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळेल की नाही? याबाबत त्याने अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे विराट जर वर्ल्ड कपमध्ये खेळला नाही तर त्याच्या जागी इशानला लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या कामगिरीवर विराट लक्ष
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आयपीएल स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. हिंदुस्थानात होणाऱया आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल यंदा 23 मार्च ते 29 मेदरम्यान होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमध्ये आरसीबीकडून खेळणाऱया विराटच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोहलीच्या भवितव्याबाबत सल्लामसलत केली जाईल, असेही बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याला पुढे जायचे असेल तर त्याच्या निर्णयाचा आदर केला जाईल. पण भविष्यातील योजनांसाठी आतापासूनच नियोजन आवश्यक असल्याने पर्याय तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.






























































