
संजू सॅमसन स्पर्धेदरम्यान अनेक महत्त्वाच्या सामन्यांत प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर राहिल्याने चर्चेत होता. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तो बेंचवर होता. अभिषेक शर्माची तब्येत बिघडल्यामुळे नामिबियाविरुद्ध त्याला संधी मिळाली, मात्र त्याने २२ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा त्याला बाहेर बसावे लागले. सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याला स्थान मिळाले नाही. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भाष्य केलं आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध २४ धावा केल्यानंतर सॅमसनवर टीका वाढली. मात्र रविवारी (१ मार्च) कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात त्याने नाबाद ९७ धावांची खेळी करत सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले. या निर्णायक सामन्यात सॅमसनने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी निर्णयामागचे कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, हा निर्णय केवळ कामगिरीवर आधारित नव्हता तर मानसिक तयारीशी संबंधित होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर सॅमसनवर मोठा दबाव होता. “कधी-कधी खेळाडूला ब्रेक देणे गरजेचे असते. त्याला प्रेशरमधून बाहेर काढायचे असते, जेणेकरून तो योग्य वेळी संघासाठी मोठे योगदान देऊ शकेल,” असे गंभीर यांनी सांगितले.
























































