अमेरिका–विंडीजमध्ये फलंदाजांची फटकेबाजी दिसत नसली तरी गोलंदाजांची दहशत मात्र दिसतेय. तसेच 20 संघांना स्थान दिल्यामुळे पंटाळवाण्या झालेल्या स्पर्धेत लिंबू–टिंबू संघांनीच जान आणल्याचे चित्र उभे राहिलेय. प्रथमच खेळत असलेला यजमान अमेरिका आणि स्कॉटलंड संघांची पावले सलग दोन विजयांमुळे सुपर एटच्या ट्रकवर सुस्साट सुटली आहेत. लिंबू–टिंबू संघांच्या सनसनाटी कामगिरीमुळे गत जगज्जेता इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या संघांवर साखळीतच बाद होण्याच्या कडेवर आहेत. या संघांना स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी आता चमत्काराची गरज आहे.
आयसीसीने प्रथमच टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाचा आकडा 20 वर नेल्यामुळे त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. ही स्पर्धा पंटाळवाणी आणि एकतर्फी होण्याची भीती वर्तवली होती. त्यानुसार वर्ल्ड कपचे आतापर्यंतच्या 75 टक्के लढती एकतर्फीच झाल्या आहेत, पण काही लढतींनी या स्पर्धेचा चेहरामोहराच बदलला आहे. या स्पर्धेत काही धक्कादायक निकाल लागल्यामुळे काही दिग्गज संघांवर साखळीतच बाद होण्याचे संकट ओढावले आहे.
मुळात पाच–पाच संघांचे चार गट असलेली ही स्पर्धा साखळीत प्रथमदर्शनी एकतर्फी भासत होती. एक गट वगळता सुपर एटचे सात संघ आधीच निश्चित मानले जात होते, मात्र प्रत्यक्षात सारे काही बदलले आहे. अमेरिकेने पाकला हरवून जी खळबळ माजवली ती आता हळूहळू वाढलीय. अ गटात अमेरिका जवळजवळ सुपर एटमध्ये पोहोचलीय. फक्त त्यांना आयर्लंडविरुद्ध विजय नोंदवायचा आहे. पाकिस्तानचा संघ आता व्हेंटिलेटरवर असला तरी उद्या पॅनडाविरुद्ध ते जिंकून आपली धाकधूक कायम ठेवतील. कारण अमेरिकेचा तिसरा विजयच त्यांच्या पॅकअपवर शिक्कामोर्तब करू शकतो. तो विजय हिंदुस्थानविरुद्ध झाला तर पाकचा बाजार उठलाच म्हणून समजा.
अ गटाप्रमाणे ब गटातही सारे काही आलबेल आहे. जगज्जेत्या इंग्लंडवर वन डे वर्ल्ड कपपाठोपाठ टी-20 वर्ल्ड कपमध्येही तेच संकट ओढावले आहे. यासाठी पाऊस त्यांच्या आडवा आला आहे. स्कॉटलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याचा फटका इंग्लंडला बसण्याची शक्यता आहे. स्कॉटलंडने नामिबिया आणि ओमानला हरवले आहे. आता त्यांची शेवटची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या खात्यात एकही विजयाची नोंद झाली नसून त्यांना ओमान आणि नामिबियाविरुद्ध मोठय़ा विजयाची नोंद करावी लागणार आहे. या लढतीत इंग्लंड काहीसा कमी पडला तर त्याचे परतीचे तिकीट कन्फर्म झाले म्हणूनच समजा.
क गटात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला धक्का देत सुपर एटचा दावा केला आहे. इथेही न्यूझीलंड अडचणीत सापडला आहे. त्यांना परवा विंडीजविरुद्ध जिंकावेच लागणार आहे, अन्यथा अफगाणिस्तान आणि विंडीजला सुपर एटमध्ये जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. ड गटात दक्षिण आफ्रिका अव्वल असली तरी बांगलादेश आणि नेदरलँड्ससुद्धा शर्यतीत आहेत. बांगलादेश थोडा ढिला पडला तर नेदरलँड्सचा सुपर एटचा दावा आपोआप मजबूत होईल. त्यामुळे धक्कादायक झालेल्या साखळीतून दोन किंवा तीन कसोटी संघाचा दर्जा नसलेले संघ सुपर एटसाठी पात्र ठरले तर हा आयसीसीचा मोठा विजय असेल.