T20WC टीम इंडियाला तगडा धक्का, पेनकिलर इंजेक्शनशिवाय ‘या’ खेळाडूला खेळता येईना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीचा टी-20 वर्ल्डकप काही दिवसांवर आला आहे. तब्बल पाच वर्षानंतर होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी टीम इंडिया फेव्हरेट आहे. मात्र टीम इंडियाच्या तयारीला तगडा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा आघाडीचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो या स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू यूएईमध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा खेळत आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीही या स्पर्धेत उतरला असून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. गुडघ्याला दुखापत झालेली असतानाही वरुण ही स्पर्धा खेळत आहे.

वरुण चक्रवर्ती आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. मात्र त्याच्या गुडघ्याला दुखापत झालेली असून तो पेनकिलर इंजेक्शन घेऊन मैदानात उतरत आहे. त्याच्या गुडघ्याला वेदना होत आहेत. मात्र टी-20 वर्ल्डकप डोक्यावर नसता तर बीसीसीआयने त्याला खेळवलेही नसते. सध्या फोकस टी-20 वर्ल्डकपवर असून त्याला वेदनांपासून दिलासा कसा मिळेल याबाबत विचार सुरू आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

केकेआरचा सपोर्ट स्टाफ वरुण चक्रवर्ती याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. चार षटकांची गोलंदाजी टाकता यावी यासाठी त्याला पेनकिलर इंजेक्शनही देण्यात येत आहे. यामुळे गुडघ्याच्या वेदना काही काळासाठी थांबतात. टीव्हीवर त्याच्या वेदना जाणवत नाहीत, परंतु गोलंदाजी करताना त्याला वेदना होतातच, असेही ते म्हणाले.

IPL 2021 मुंबई इंडियन्सचा मार्ग खडतर पण ‘सर्व शक्य आहे’, वाचा प्ले ऑफचे गणित

तर चहलला संधी

वरुण चक्रवर्ती याने आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत 15 बळी घेतले आहेत. मात्र त्याच्या गुडघ्याची दुखापत आणखी बळावल्यास बीसीसीआय युझवेंद्र चहल याच्या नावाचा विचार करू शकते. 10 ऑक्टोबरपर्यंत संघांत बदल करण्याची संधी बीसीसीआयकडे आहे.

IPL 2021 ‘हिटमॅन’ रोहितचा नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई खेळाडू