तारक मेहताच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, दिशा वकानीचा मालिकेला रामराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावर गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका लोकप्रिय ठरली होती. म्हणूनच या मालिकेसंदर्भातील अनेक वृत्तं देखील चर्चिली गेली होती. तारक मेहतांची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याच्या वृत्ताला उधाण आलं होतं. आता या मालिकेसंदर्भात आता अजून एक महत्त्वाची बातमी येत आहे.

या मालिकेत आपल्या बोलण्याच्या विवक्षित पद्धतीने प्रेक्षकांना हसवणारी अभिनेत्री दिशा वकानी उर्फ दयाभाभी हिने मालिकेला रामराम केला आहे. आता निर्माते असित मोदी दुसऱ्या दयाच्या शोधात असून त्यांनी ऑडिशन्सना सुरुवात केली आहे.

2017पासून दिशा वकानी या मालिकेत दिसत नव्हती. गर्भवती असल्याने दिशाने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. मुलीच्या जन्मानंतर ती काही दिवसांनी परतणार असं बोललं जात होतं. मात्र, आधी मुलगी लहान असल्याने आणि नंतर कोविडमुळे तिचं मालिकेतील येणं लांबलं होतं.

गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेनंतर काही काळाने सर्व सुरळीत सुरू झाल्यानंतर दिशाने मालिकेत परतावं यासाठी निर्माते तिची मनधरणी करत होते. पण, डिसेंबर महिन्यात व्हायरल झालेल्या एका फोटोने प्रेक्षकांच्या या अपेक्षेवरही पाणी फिरवलं. डिसेंबरमध्ये एका खासगी कौटुंबिक कार्यक्रमात दिशाने लावलेल्या हजेरीचा फोटो व्हायरल झाल होता. त्यात ती गर्भवती असल्याचं दिसून येत होतं.

काही दिवसांपूर्वीच दिशाने एका मुलाला जन्म दिल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. त्यामुळे दिशा आता पुन्हा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत परतणार नाही, हे जवळपास निश्चित झालं होतं. निर्माते असित मोदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता मालिकेत नवीन अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारणार असून त्यासाठी ऑडिशन्स सुरू आहेत. लवकरच प्रेक्षकांना नवीन दयाभाभी पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.