‘तारक मेहता का…’ फेम अभिनेत्रीचा पतीसोबत पुनर्विवाह, आई-वडिलांच्या लग्नात 2 वर्षांचा मुलगा वऱ्हाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या आपल्याच पतीसोबत पुनर्विवाह करण्याचे फॅड आले आहे. दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिने आपल्या पतीसोबत धूमधडाक्यात लग्न केले होते. आता आणखी एका अभिनेत्रीने आपल्या पतीसोबत पुन्हा लग्न केले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रिया आहुजा.

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेत प्रिया आहुजा ही रिटा रिपोर्टरची भूमिका करते. या भूमिकेमुळे तिला मानसन्मान आणि पैसाही मिळाला. घराघरात पोहोचलेल्या प्रियाने पती मालव रजदा याच्यासोबत आज 20 नोव्हेंबर रोजी रितीरिवाजाप्रमाणे पुन्हा विवाह केला. याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

प्रिया आहुजा हिने 10 वर्षांपूर्वी मालद रजदा याच्यासोबत विवाह केला होता. आज या दोघांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे. हे औचित्य साधत प्रिया आणि मालद यांनी पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवला.

विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची संपूर्ण टीम सहभागी झाली. यासह त्यांचा दोन वर्षांचा चिमुकला अरदास हा देखील वऱ्हाडी बनून लग्नात सहभागी झाला. अरदास याचा जन्म 27 नोव्हेंबर 2019 ला झाला होता.

दरम्यान, प्रिया आणि मालद यांच्या पुनर्विवाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नामध्ये प्रिया हिने बेबी पिंक कलरचा लहंगा घातला होता, तर मालद याने क्रीम कलरची शेरवानी घातली होती. प्रियाने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांसह मालद रजदा यानेही कमेंट केली असून तुझ्यासोबत प्रत्येक दहा वर्षांनी लग्न करण्याची इच्छा आहे असे त्याने म्हटले आहे.