‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र या मालिकेच्या निर्मात्यावर अनेक गंभीर आरोप केले गेले. आधी सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्माता असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. हे प्रकरण अजूनही गाजत असताना आता या मालिकेतील सोनूची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने निर्मांत्यावर मेंटल हॅरेसमेंटचा आरोप केला आहे.
टतारक मेहता का उल्टा चष्माट या मालिकेतील सोनूने शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पलकने ही मालिका सोडण्याचा विचार केल्यानंतर तिला मालिकेतर्फे कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. यानतंर पलकने निर्मात्यावर गंभीर आरोप केले. पलकने शो सोडल्यानंतर निर्मात्यांने तिला भरपूर त्रास दिला. तिला अनेकदा धमकीही देण्यात आली. याचसोबत तिला मानसिक त्रासही दिला गेल्याचे पलकने सांगितले.
पलक सिंधवानी आणि जेनिफर यांच्यासह अनेक कलाकारांनी निर्माता असित मोदीवर आरोप केले होते. शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनीही निर्मात्यांना पैसे न दिल्याचा आरोप केला. तसेच जेनिफरनंतर रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहुजा राजदा आणि बावरीची भूमिका साकारणारी मोनिका भदोरिया यांनी देखील असितवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता पलकने केलेल्या छळाच्या आरोपामुळे जेनिफरने पलकला पाठिंबा दर्शवला आहे.
जेनिफरने पलकसोबत खंबीरपणे उभी राहण्याचा निर्णय घेतला आहे. पलकसोबत सध्या जे काही घडत आहे, ते शोच्या प्रत्येक कलाकारासोबत घडतेय. ज्याला शोमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्याशी निर्माते अशाप्रकारे वागतात. पलक खूप गोड मुलगी आहे आणि मला काळजी वाटते की, निर्मात्यांनी तिला पैसे दिले नसावेत, असे जेनिफर म्हणाली.