32 बेवारस गाड्यांच्या लिलावातून ताडदेव आरटीओने 14.3 लाख कमविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील ताडदेव आरटीओच्या आवारात वाहनाचा कर आणि दंड चुकविल्याने गेली दहा वर्षे पडून असलेल्या 32 भंगार गाड्यांच्या ई-लिलावातून 14.3 लाखांची कमाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ताडदेवच्या मुंबई (मध्य) आरटीओच्या आवारात गेली दहा वर्षे कर आणि दंड चुकविलेली वाहने पडून होती. या वाहनांना घेण्यासाठी कोणीही वारसदार पुढे न आल्याने न्यायालयाच्या परवानगीने या भंगार गाड्यांचा 30 मार्च रोजी लिलाव करण्यात आल्याची माहिती ताडदेव आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली. लिलाव केलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने टँकर, बस, कार यांचा समावेश होता. या लिलावामुळे ताडदेव आरटीओच्या आवारातील परिसर मोकळा झाला असून या ठिकाणी आता वाहनांची फिटनेस टेस्ट घेण्यासाठी जागा उपलब्ध झाल्याची माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली आहे.