
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्या अशी विनंती करणारे पत्र आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या निकालाची प्रतही झिरवळ यांना देण्यात आली.
शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या शिष्टमंडळाने आज नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्ष मुंबईत नसल्याने मागणीचे पत्र उपाध्यक्षांकडे दिल्याचे सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्राप्रमाणेच मणिपूरमध्येही अशीच सत्तासंघर्षाची परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तेथील सरकारला लवकरात लवकर सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. त्याच धर्तीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही जितक्या लवकर होईल तितकी आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घ्यावी अशी विनंती पत्रात करण्यात आल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली.
लोकशाही पद्धती व संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्या आदेशाचे पालन विधानसभा अध्यक्ष करतील आणि सुनावणी लवकर व्हावी अशी मागणी करणे हा आमचा अधिकार आहे, असे प्रभू यावेळी म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांकडे चार्ज असल्याने न्यायालयाच्या चाकोरीत बसून आम्ही त्यांना पत्र दिले आहे. पहिले 16 आणि नंतरचे 24 अशा 40 आमदारांबद्दलची सुनावणी प्रलंबित आहे. अध्यक्षांना पुन्हा पत्र द्यावे लागले तरी आम्ही देऊ असेही प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले.
View this post on Instagram
शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह आमदार अॅड. अनिल परब, विलास पोतनीस, रमेश कोरगावकर, मनीषा कायंदे, ऋतुजा लटके, सचिन अहिर आदींचा समावेश होता.



























































