बिबट्याच्या हल्ल्यात 60 ससे ठार, तलासरीतील करजगावच्या ससेपालन शेडमध्ये घुसून ससे केले फस्त

तलासरीतील मौजे करजगाव येथे 3 मे रोजी एका बिबट्याने एक महिला, पुरुष आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला चढवल्याची घटना ताजी असताना अवघ्या आठवडाभरात याच गावात एका बंदिस्त ससेपालन केंद्रात घुसखोरी करून बिबट्याने 60 सशांचा बळी घेतला. त्यातील 10 ते 15 ससे बिबट्याने फस्त करून पलायन केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

तलासरी तालुक्यातील करजगाव येथे दयानंद आंबोळकर यांच्या शेतावर त्यांनी ससेपालन केंद्र सुरू केले आहे. बंदिस्त शेडमध्ये हे ससे पाळले होते. शुक्रवारी रात्री बिबट्याने या ससेपालन केंद्रात घुसखोरी करून सशांवर हल्ला चढवला आणि 60 ससे ठार मारले. त्यातील दहा ते पंधरा ससे बिबट्याने फस्त केले. या हल्ल्यानंतर बिबट्या पळून गेला. सकाळी सशांना चारा टाकण्यासाठी आंबोळकर या शेडमध्ये गेले असता त्यांना मोठा धक्का बसला. असंख्य ससे इतस्ततः मृतावस्थेत पडले होते. शेडमध्ये आणि बाजूच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे उमटले होते.

शेतात मुक्काम करणाऱ्या गावकऱ्यांत घबराट
या घटनेनंतर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत सविस्तर पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत सशांचे शवविच्छेदन केले. गावातील लोक मोठ्या प्रमाणावर शेतातच वास्तव्य करतात. रात्री-अपरात्री, पहाटे शेतकामासाठी बाहेर पडावे लागते. अशावेळी बिबट्याने अवघ्या आठवड्याभरात गावात दोनदा हल्ला करून माणसांना जखमी करत सशांचे बळी घेतल्याने शेतकऱ्यांसह महिला, वृद्ध, लहान मुले आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे