
तळोजा कारागृहाच्या ग्रंथालयातील तुटपुंज्या पुस्तकांचा संग्रह पाहता मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी तीव्र नाराजी व्यक्त करत पुस्तकांचा संग्रह वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र कारागृहातील ग्रंथालयासाठी आणखी पुस्तके खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून अद्याप निधीच मिळालेला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. कैद्यांना वाचायला फक्त 2 हजार 998 पुस्तकेच असून 7 एप्रिलपासून एकही नवीन पुस्तक खरेदी करण्यात आलेले नाही.
इंग्रजी विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांचे पुस्तक वाचायला दिले जात नाही, अशी माहिती भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली होती. त्यावरून न्यायालयाने सरकारला झापत खडे बोल सुनावले होते. तसेच पुस्तकांचा संग्रह वाढवण्याचे आदेश दिले होते; मात्र नवीन पुस्तक घेण्यासाठी अद्याप सरकारकडून निधी मिळाला नसल्याचेही उघडकीस आले आहे.





























































