
तामिळनाडूत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री विजय यांनी गृह, सार्वजनिक प्रशासन, सामान्य प्रशासन, महिला व युवा कल्याण, बाल कल्याण, वृद्ध व दिव्यांग कल्याण, नगररचना प्रशासन आणि शहरी पाणीपुरवठा यांसारखी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत.
कोणाला कोणते मंत्रालय मिळाले?
टीव्हीके (TVK) पक्षाचे ज्येष्ठ नेते सेंगोट्टैयन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते अर्थ, पेन्शन आणि पेन्शन भत्त्यांशी संबंधित कामे पाहतील तसेच मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री सेल्वी एस. कीर्तन यांच्याकडे उद्योग मंत्रालयाचा प्रभार देण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्याकडे गुंतवणूक प्रोत्साहन विभागाचीही जबाबदारी असेल. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या कीर्तन यांना इतके महत्त्वाचे खाते देणे हा तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठा निर्णय मानला जात आहे.
एन. आनंद यांच्याकडे ग्रामीण विकास, पंचायत, पंचायत युनियन, गरिबी निर्मूलन कार्यक्रम, ग्रामीण कर्ज आणि सिंचन प्रकल्पांची जबाबदारी असेल. टीव्हीके पक्षाचे प्रवक्ते आधव अर्जुन हे इमारत बांधकाम, महामार्ग, लहान बंदरे आणि क्रीडा विकास विभागाचे कामकाज सांभाळतील. डॉ. केजी अरुणराज यांच्याकडे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा जिम्मा देण्यात आला आहे. पी. व्यंकटरामनन हे ग्राहक संरक्षण आणि किंमत नियंत्रण विभागाचे काम पाहतील. आर. निर्मलकुमार यांच्याकडे वीज, अपारंपरिक ऊर्जा विकास, कायदा, न्यायालये, तुरुंग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विधानसभा, निवडणूक आणि पासपोर्टशी संबंधित खाती राहतील. राजमोहन यांच्याकडे पुरातत्व, तमिळ अधिकृत भाषा, तमिळ संस्कृती, चित्रपट तंत्रज्ञान, सिनेमॅटोग्राफ कायदा, वृत्तपत्र कागद नियंत्रण आणि शासकीय मुद्रणालय ही खाती असतील. तसेच डॉ. टीके प्रभू हे खनिज आणि खाण विभागाची जबाबदारी सांभाळतील.



























































