
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रावर अडून राहिल्याने तामीळनाडूत सत्तास्थापनेवरील प्रश्नचिन्ह आजही कायम राहिलं. टीव्हीकेकडून आकड्यांची जुळवाजुळव दिवसभर सुरू होती. त्यात माकप आणि भाकप या दोन पक्षांनी पाठिंब्याचे पत्र आज दिले. त्यामुळे टीव्हीकेने 116 इतक्या संख्याबळापर्यंत मजल मारली असून व्हीसीकेच्या दोन आमदारांच्या निर्णयावरच टीव्हीकेच्या ‘विजय’पथाचे भवितव्य ठरणार आहे.
तामीळनाडूत विजय यांचा टीव्हीके पक्ष 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र बहुमतासाठी आवश्यक 118 या जादुई आकड्यापासून टीव्हीके दूर राहिला आहे. काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. तरीही गोळाबेरीज 113 वर अडली होती. त्यात विजय हे दोन ठिकाणी निवडून आल्याने टीव्हीकेची एक जागा वजा धरली जाणार आहे. या स्थितीत आणखी सहा आमदारांच्या पाठिंब्याची विजय यांना आवश्यकता असून विजय यांनी सलग दोन दिवस राज्यपालांची भेट घेतली, मात्र 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र मागत ते अडून राहिले. हा पेच आजही कायम राहिला. डीएमकेसोबत निवडणूक लढणाऱया माकप, भाकप या पक्षांनी आज टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन 116 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देत सत्तास्थापनेचा पुन्हा दावा केला. मात्र 118 आमदारांच्या पत्राशिवाय सत्तास्थापनेचे आमंत्रण देता येणार नाही, असे परत एकदा राज्यपालांनी टीव्हीकेला सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
डीएमकेची लोकसभेत वेगळी चूल
काँग्रेसने तामीळनाडूत साथ सोडल्यानंतर द्रमुकने लोकसभेत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सभागृहात डीएमकेचे सदस्य काँग्रेसच्या सदस्यांसोबत बसू शकत नाही. त्यामुळे आमच्या सदस्यांची वेगळी आसन व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे.
राहुल गांधी-खरगेंनी सूत्रे हलवली
तामीळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेचा ‘विजय’पथ सुकर करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे यांनी झटपट निर्णय घेतले. निकालानंतर दुसऱयाच दिवशी द्रमुकची साथ सोडून विजय यांना पाठिंबा जाहीर करत पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर राहुल गांधी आणि खरगे यांनी माकप, भाकप या पक्षांसोबत चर्चा केली. टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मदत करावी लागेल असे त्यांनी या पक्षांना सांगितले. ही चर्चा फलदायी ठरली.
आर्लेकर म्हणतात, घोडेबाजार होऊ देणार नाही!
आपली भूमिका लोकशाहीला पुढे नेण्याची आहे. कोणालाही सत्तेवर येण्यापासून रोखण्याची नाही. सरकार स्थापन करण्याचा हक्क सांगणाऱया कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला मी एकच प्रश्न विचारतो की, त्यांच्याकडे 118 आमदारांचं बहुमत आहे का? कारण 118 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. बहुमत नसलेल्या सरकारला स्थापन करून घोडेबाजार होऊ देता येणार नाही, असे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी म्हटले आहे.
‘व्हीसीके’वर सर्वांच्या नजरा
टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी दोन आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे व्हीसीकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हीसीकेने ऐनवेळी आजचा निर्णय उद्यावर ढकलला. व्हीसीके उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. व्हीसीकेच्या दोन आमदारांनी पाठिंब्याचे पत्र दिले तरच विजय यांच्यासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.
पाठिंबा कोणाकोणाचा?
- काँग्रेस, माकप, भाकप या तीन पक्षांचा टीव्हीकेला पाठिंबा.
- काँग्रेसचे पाच तर बाकी दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत.
- मुस्लिम लीगच्या 2 आमदारांनी पाठिंबा जाहीर केला होता, मात्र रात्री त्यांनी निर्णय बदलला.
लोकभवनबाहेर निदर्शने
विजय यांना राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले जात नसल्याने टीव्हीके समर्थकांनी आक्रमक होत लोकभवन समोर निदर्शने केली. पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन थांबवले.


























































