
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी सुपरस्टार रजनीकांत त्यांचा पक्ष स्थापन करणार आहेत. जानेवारी महिन्यात आपण पक्ष स्थापन करणार असून याबाबतची घोषणा या वर्षाच्या शोवटच्या दिवशी 31 डिसेंबरला करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी ट्विट करून गुरुवारी दिली आहे. रजनीकांत यांनी राजकारणातील प्रवेशाची घोषणाही 31 डिसेंबर 2017 रोजी केली होती.
रजनीकांत यांनी बुधवारी राजकीय सल्लागारांची बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती देण्यास त्यांचे राजकीय सल्लागार थमिझारुवी मनियान यांनी नकार दिला. रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार किंवा नाही, पक्ष स्थापन करणार किंवा नाही, कधी करणार, याबाबत तेच योग्यवेळी माहिती देतील, असेही ते म्हणाले. आपण त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
याआधी रजनीकांत यांनी आपल्या जिल्हा सचिवांसोबत बैठक घेतली होती. त्यावेळी पक्ष स्थापनेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. आपण लवकरात लवकर याबाबतची घोषणा करू, असे त्यांनी बैठकीत सांगितले होते. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका 2021 मध्ये होणार आहेत. आपल्या पक्षाचे 60 ते 65 टक्के उमेदवार 45 ते 50 वर्षांचे असतील, अशी घोषणा रजनीकांत यांनी केली होती. तर इतर जागांवर प्रतिष्ठीत, न्यायाधीश, माजी सनदी अधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात येईल, असेही ते म्हणाले होते.
रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 मध्ये आध्यात्मिक राजकारण करण्यासोबत 2021 मध्ये तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभेच्या जागा लढवण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. आता जानेवारीमध्ये रजनीकांत पक्ष स्थापन करणार असून 31 डिसेंबरला याबाबतची घोषणा करणार आहेत. त्यांच्या चाहत्यांसह तामिळनाडूतील जनतेला त्यांच्या पक्षाबाबत उत्सुकता आहे.



























































