
अखेरच्या चेंडूपर्यंत ब्लड प्रेशर वाढविणाऱया थरारक किताबी लढतीत शाहरुख खानने षटकार ठोकून तामीळनाडूचे सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद राखण्यात मोलाची भूमिका बजावली. कर्नाटकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मोक्याच्या वेळी 15 चेंडूंत नाबाद 33 धावांची खेळी करणारा शाहरुख सामन्याचा मानकरी ठरला.कर्नाटककडून मिळालेले 152 धावांचे लक्ष्य तामीळनाडूने 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 153 धावा करून पूर्ण केले.
शाहरुख खानचा संयम अन् षटकार
कर्नाटकच्या विजयाच्या आशा पल्लवीत झालेल्या असताना शाहरुख खान त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरला. त्याने 15 चेंडूत एक चौकार व 3 षटकारांसह नाबाद 33 धावांची खेळी करीत तामीळनाडूच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तमिळाडूला अखेरच्या चेंडूत 16 धावांची गरज होती. प्रतीक जैनच्या या निर्णायक षटकाचे स्वागत साई किशोरने चौकार मारून केले. तिसरा अन् पाचवा चेंडू वाईड गेला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना इतका वेळ संयमाने खेळणाऱया शाहरुखने डिप स्व्केअर लेगच्या वरून षटकार ठोकत तामीळनाडूला विजेतेपद मिळवून दिले. कर्नाटककडून केसी करिअप्पाने 2, तर प्रतिक जैन, विद्याधर पाटील व करूण नायर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.






























































