
राज्यात गद्दार मंत्र्यांच्या गुंडगिरीने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मानसिक छळामुळे टपरीचालक असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात आपली आपबीती कथन केली आहे. तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करेपर्यंत आपला मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येऊ नये, असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान, आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तरुणाच्या कुटुंबाने तब्बल नऊ तास मृतदेह भूम पोलीस ठाण्यात आणून ठेवला होता.
भूम शहरातील गालिफनगर येथील फय्याज दाऊद पठाण या तरुणाने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी फय्याजने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी यांनी आपला अतोनात मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. फय्याज हा डॉ. स्वामी यांच्याकडे गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. परंतु त्याने ती नोकरी सोडली. त्यानंतर डॉ. स्वामी यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गुंड कार्यकर्ता सुरेश कांबळेच्या मार्फत आपल्याला मारहाण केली. आपला प्रचंड मानसिक छळ केला. त्यामुळे आपण जीवन संपवत असून आपल्या कुटुंबाचे पुढे काही बरेवाईट झाल्यास पोलीस निरीक्षक साळवे यांच्यावर जबाबदारी असेल, असेही फय्याजने म्हटले आहे. पोलीस ठाण्यासमोर येऊन गुंड सामान्यांना धमकी देत असतील तर पोलीस ठाणे कशाला हवेत? त्यापेक्षा त्याला कुलूप लावा, असेही त्याने म्हटले आहे. फय्याजच्या पश्चात आई, वडील, पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, अडीच महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.
फय्याजचा मृतदेह पोलीस ठाण्यात
डॉ. नंदकुमार स्वामी, सुरेश कांबळे यांच्यासह इतरांना ताबडतोब अटक करा, या मागणीसाठी फय्याजचा मृतदेह त्याच्या नातलगांनी पोलीस ठाण्यात आणला. तब्बल नऊ तास मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारातच होता. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. गर्दी वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी लाजेकाजेस्तव भादंविच्या कलम 396 अन्वये तानाजी सावंत यांचे ‘क्रिएटर’ सुरेश कांबळे, डॉ. नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी, शिवदत्त डोके, सचिन येवते यांच्यावर गुन्हा दाखल केला.
…तर फय्याज वाचला असता
भूम बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या संचालकांना पळवून नेले होते. त्यात हाच सुरेश कांबळे मुख्य आरोपी होता. पोलिसांनी त्यावेळी तानाजी सावंतांच्या दबावामुळे थातूरमातूर कलमे लावल्याने चारच दिवसात कांबळे बाहेर आला. पोलिसांनी योग्य कलमे लावली असती तर कांबळेचा जामीनही झाला नसता आणि फय्याजचा जीव वाचला असता.



























































