देवच पावला… तानसा तलावही भरून वाहू लागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tansa-lake-overflowing

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱया धरणांपैकी महत्त्वपूर्ण असलेला ‘तानसा’ तलाव गुरुवारी ओव्हरफ्लो झाला. गेल्या दोन दिवसांत तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तलावांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. सातही तलावांत मिळून 8 लाख 37 हजार 395 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून मुंबईला 232 दिवसांना पुरणारा आहे. सध्या सुरू असलेला पावसाचा जोर पाहता लवकरच उर्वरित तलावही भरून वाहू लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ह मागील दोन आठवडे दडी मारलेला पाऊस मंगळवारपासून पुन्हा सक्रिय झाला. यामुळे तलाव क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तलावांमधील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी,विहार व भातसा अशा सात तलावांमधून दररोज 3650 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला 31 ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलाव मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या सातही तलावांत मिळून 8 लाख 37 हजार 395 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यात तुळशी तलाव 12 जुलै रोजी तर तानसा तलाव गुरुवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला.