तारकर्ली समुद्रात साताऱ्यातील तिघे बुडाले, दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश

मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील एमटीडीसीसमोरील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना सातारा येथील सहा पर्यटक तरुणांमधील तिघे जण समुद्रात बुडाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ओंकार अजित शेलार ( 24, रा. सातारा) व आकाश रामदास बेबले (24, रा. सातारा) या दोघांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले, तर ऋषिकेश दारासिंग वाघमोडे हा समुद्रात बेपत्ता झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला.

सातारा येथील ओंकार अजित शेलार, आकाश रामदास बेबले, रोशन जोतिराम फडतरे, प्रतीक शिवनाथ पेंदळे, सुजित अनिल जाधव, ऋषिकेश दारासिंग वाघमोडे या सहा तरुणांचा ग्रुप मालवणात पर्यटनासाठी आला होता. वायरी येथील होम स्टेमध्ये ते वास्तव्यास होते. आज सकाळी हे तरुण तारकर्ली येथे समुद्री पर्यटनासाठी दाखल झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण तारकर्ली एमटीडीसी पेंद्रासमोरील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी उतरले. समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटत असतानाच लाटेच्या तडाख्यात यातील ऋषिकेश वाघमोडे, ओंकार शेलार व आकाश बोबले हे तिघे पाण्यात बुडाले. या वेळी इतर तिघांनी आरडाओरडा केला असता किनाऱ्यावर असलेल्या ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक व मच्छीमार यांनी समुद्रात धाव घेतली. प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्थानिकांनी ओंकार व आकाश या दोघांना समुद्राबाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र ऋषिकेश वाघमोडे हा समुद्रात  बेपत्ता झाला. किनाऱ्यावर आणलेल्या ओंकार शेलार व आकाश बेबले या दोघांना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. उपचारानंतर या दोघांची प्रपृती स्थिर आहे.

तारकर्ली समुद्रात बेपत्ता झालेल्या ऋषिकेश वाघमोडे याचा स्थानिक ग्रामस्थांकडून समुद्रात शोध घेण्यात येत होता. मात्र सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश वाघमोडे याचा मृतदेह तेथीलच समुद्रात सापडून आला. हा मृतदेह किनाऱ्यावर आणल्यावर पोलिसांनी पंचनामा केला. यानंतर हा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.