
देशातील आघाडीची कंपनी टाटा लवकरच ऑनलाईन रिटेल क्षेत्रात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. व्ही चॅटप्रमाणे टाटा कंपनी सुपर अॅप लाँच करणार असून त्यासाठी वॉलमार्टशी हात मिळवणी करणार आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार वॉलमार्ट टाटा समूहामध्ये 1.8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
टाटाच्या सुपर अॅपमध्ये फॅशन, लाईफस्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स, रीटेल, ग्रॉसरी, इन्शुरन्स, फायनान्शियल सर्व्हिस यासह डिजिटल आणि एज्युकेशनल कंटेट देखील उपलब्ध असणार आहे. सध्या मुकेश अंबानी यांची रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. या कंपनीचे देशभरात 12 हजार स्टोअर आहेत. या कंपनीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जियोच्या 40 कोटी ग्राहकांचा फायदा मिळतो. तर टाटा समूहाचे चहा पावडरपासून कारपर्यंत 100 पेक्षा जास्त व्यवसाय असल्याने याचा फायदा टाटाच्या नव्या पोर्टलला होऊ शकतो. टाटा कंपनीने वॉलमार्टसोबत हातमिळवणी केली तर टाटाला फ्लिपकार्टची मदत मिळेल. वॉलमार्टने फ्लिपकार्टला 16 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले आहे.
टाटा ग्रुपसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत.
- कंपनी सध्या टेलिकाॅम क्षेत्रातून बाहेर आहे. जर कंपनी या क्षेत्रात अजूनही कार्यरत असली असती तर या अँपसाठी टाटा समूहाला नक्कीच मोठा फायदा झाला असता.
- एअर इंडिया आणि एअर आशिया या कंपन्या आर्थिक संकटात आहेत. एअर इंडियाची मालकी पूर्वी टाटा समूहाकडे होती. टाटाला एविएशन सेक्टरमध्ये टिकून राहायचे असेल तर एअर इंडिया कंपनीची खरेदी करावी लागेल. ज्यासाठी कंपनीला खूप मोठय़ा प्रमाणात पैसे मोजावे लागतील. सध्या टाटा कंपनीवर 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे.


























































