
सामना प्रतिनिधी । पुणे
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत हिंदुस्थानच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या साकेत मायनेनी याने तैपेईच्या जेसन जुंगचा 6-1, 5-7, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.
बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या हिंदुस्थानच्या साकेत मायनेनी याने तैपेईच्या जेसन जुंगला 6-1, 5-7, 6-2 असे हरवून पात्रता फेरीच्या दुसर्या चरणात प्रवेश केला. ऑस्ट्रियाच्या सेबस्तियन ऑफनर याने दुसर्या मानांकित बेल्जियमच्या रुबेन बेमेलमन्सचा 5-7, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. इटलीच्या सातव्या मानांकित जियालूइजी क्वेनजी याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या हिंदुस्थानच्या शशिकुमार मुकुंदला 6-1, 6-1 असे एकतर्फी नमवून पात्रता फेरीच्या दुसर्या चरणात प्रवेश केला. ब्राझीलच्या तिसर्या मानांकित थायगो माँटेरोने जर्मनीच्या डॅनियल ब्रँडस्चा टायब्रेकमध्ये 7-6(5), 7-5 असा पराभव करून आगेकूच केली.
प्रजनेशसमोर मायकेलचे आव्हान
एटीपी 250 वर्ल्ड टूर टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचा मुख्य फेरीचा ड्रॉ समारंभ शनिवारी थाटात पार पडला. मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत हिंदुस्थानचा अव्वल मानांकित खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरणचा सामना अमेरिकेच्या मायकेल मोह याच्याशी होणार आहे.





























































