
देशातील 60 हजार मेगावॅट क्षमतेच्या कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पांना आता बंद करणे गरजेचे झाले आहे. 35 हजार मेगावॅट क्षमतेच्या 280 हुन अधिक वीज संचाचे वय झाल्याने कार्यक्षमता घटली असून वीज निर्मिती करताना मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. तर जवळपास 200 वीज संचाचे वय झाले असून ते कर्जमुक्त आहेत. त्यामुळे त्यांना बंद करणे गरजेचे असल्याचे टाटा पॉवरच्या अहवालातून समोर आले आहे.
देशाची दैनंदिन विजेची मागणी पावणेदोन लाख मार्गवॅटहुन अधिक आहे. सदर मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या 80 टक्के वीज औष्णिक वीज प्रकल्पातून घेतली जात आहे. वाढत्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी1980 च्या दशकात देशात मोठय़ा प्रमाणात औष्णिक वीज प्रकल्प उभारले आहेत. त्याचे वय 25 वर्षे झालेले असतानाही 35 हजार मेगावॅट क्षमतेच्या वीज संचातून वीज निर्मिती सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत घट झाली असून वीज निर्मिती करताना मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे टाटा पॉवरने केलेल्या अभ्यासातून समोर आल्याचे टाटा पॉवरचे सीईओ प्रावीर सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 25 हजार मार्गवॅट क्षमतेचे 200 वीज संचाचे वय झाले असून त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेडही झाली असल्याने ते बंद करणे कठीण नाही. मात्र या प्रकल्पाचे देशातील वीज वितरण कंपन्यांसोबत वीज खरेदी करार झाले असून त्यांच्या स्थिर आकाराचा भार वीज वितरण कंपन्यांवर म्हणजे ग्राहकांवर पडत आहे. तो कमी करण्यासाठी सदर वीज संच बंद करून त्यांची जागा नव्या प्रकल्पांनी किंवा अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांनी घ्यायला हवी असे प्रावीर सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.
वय होताच टाटा आपले वीज संच बंद करणार
टाटा पॉवरने देशातील वय झालेल्या वीज केंद्रांना निवृत्त करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करतानाच आपल्या स्वतः च्या वीज केंद्राचे उपयोगिता वय संपताच तातडीने बंद करण्यात येणार असल्याचे टाटा पॉवरने स्पष्ट केले आहे.




























































