टाटा पॉवर महामार्गांवर 10 हजार चार्जिंग स्टेशन उभारणार, हजाराहून अधिक स्टेशनचा टप्पा पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेवरील वाढत्या वाहनांच्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरने देशभरातील महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी तब्बल 10 हजार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन (ईव्ही) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कंपनीने 180 शहरांमध्ये तब्बल 1000 हून अधिक चार्जिंग स्टेशन (ईव्ही चार्जिंग) उभारली आहेत. त्यामळे इलेक्ट्रिक वाहनधारकांची गैरसोय टळणार आहे.

केंद्र सरकारकडून विजेवरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार विजेवरील वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी टाटा पॉवरकडून प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत. त्याची सुरुवात मुंबईतील विक्रोळी येथून झाली होती. टाटा पॉवरने आतापर्यंत एक हजाराहून अधिक चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क उभारले आहे. प्रदूषण कमी करण्याबाबत सुरू असलेल्या देशाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा टाटा पॉवरने पार केला आहे. ही चार्जिंग स्टेशन ऑफिसेस, मॉल्स, हॉटेल्स, रिटेल आऊटलेटस् आणि इतर सार्वजनिक ठिकाणी उभारली आहेत.