68 वर्षांनंतर एअर इंडियाचा ‘महाराजा’ पुन्हा टाटांकडे, तब्बल 18 हजार कोटी रुपये मोजून घेतली विमान कंपनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोटय़ात रुतलेल्या एअर इंडियाच्या पंखांना पुन्हा भरारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जवळपास 68 वर्षांनी एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटांकडे आली आहे. टाटा सन्सने 18 हजार कोटींची बोली लावली होती. या बोलीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, लवकरच एअर इंडियाचे हस्तांतरण टाटा सन्सकडे करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

केंद्र सरकारच्या मालकीची विमान कंपनी एअर इंडिया तोटय़ात असून, तब्बल 15 हजार 300 कोटींचे कर्ज आहे. एअर इंडियाचे खासगीकरण करण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडे चार निविदा आल्या होत्या. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही बोली लावली होती. मात्र, सर्वाधिक 18 हजार कोटी रुपयांची बोली लावणाऱया टाटा सन्सकडे ‘एअर इंडिया’चा कारभार सोपविण्यात येणार आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणुकीसाठी स्थापन केलेल्या समितीकडून निविदांची तपासणी केल्यानंतर टाटांची निवड करण्यात आली. त्यानंतर ही शिफारस अंतिम निर्णयासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीगटाकडे करण्यात आली. यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले आहे.

असा झाला व्यवहार

z टाटा सन्सची बोली केंद्र सरकारने स्विकारल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुंतवणूक विभागाचे (दिपम) सचिव तृहिन कांता पांडे यांनी दिली.
z सरकारला या व्यवहारामधून 12 हजार 903 कोटी रुपयांची अपेक्षा होती. मात्र, टाटांनी 18 हजार कोटींना ‘एअर इंडिया’ विकत घेण्याची तयारी दर्शविली.
z टाटांनी 18 हजार कोटींची बोली लावली. त्यात 15 हजार 300 कोटींचे ‘एअर इंडिया’वरील कर्जाची परतफेड केली जाईल. हे कर्ज वगळता उर्वरित रक्कम टाटांकडून रोखीने दिली जाईल
असेही या वृत्तात म्हटले आहे.

आज जेआरडी असते तर फार आनंद झाला असता

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ट्विटरवर भावनिक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा भावनिक क्षण आहे. जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली ‘एअर इंडिया’ एकेकाळी जगातील सर्वात मौल्यवान एअरलाइन्स पंपनी होती. ती प्रतिमा पुन्हा निर्माण करण्यासाठी टाटा समूहाला संधी मिळाली आहे. पूर्वीसारखे स्थान आणि ओळख मिळवून देण्यासाठी ही संधी आहे. आज जेआरडी टाटा आपल्यात असते तर त्यांना फार आनंद झाला असता’, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. रतन टाटा यांनी पेंद्रातील मोदी सरकारचेही आभार मानले आहेत.