श्रीवर्धन मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंड; तटकरेच्या अडचणी वाढणार

888

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा मेळावा म्हसळा येथे रविवारी झाला. या मेळाव्याला श्रीवर्धन मतदार संघातील जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीवर्धन मतदारसंघ सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत यांच्या मतदारसंघाने तारल्याने ते विजयी झाले. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभेला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार असे चित्र निर्माण झाले असतानाच श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मतदार संघ काँग्रेसला सोडण्यात यावा या मागणीसाठी बंडाचे शस्त्र उचलल्याने सुनील तटकरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तोंडसुख घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार दहा वर्षे असूनही विकासकामे झालेली नाहीत. काँग्रेस पक्षाच्या खच्चीकरणाचे काम सुनील तटकरे यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला राखीव ठेवावा अन्यथा बंडाचा पावित्रा उचलला जाऊन अपक्ष उमेदवार देऊ असे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सांगितले.

कॉँग्रेसच्या वरिष्ठांनी श्रीवर्धन मतदार संघ पुन्हा मित्रपक्ष राष्ट्रवादीला दिल्यास आम्ही काम करणार नसून आमचा स्वतंत्र अपक्ष उमेदवार देण्याची घोषणा म्हसळा तालुका कोंग्रेसचे अध्यक्ष डॉ. शेख यांनी केले. यावेळी रोहा तालुक्याचे अध्यक्ष निजाम सय्यद, तळा तालुक्याचे अध्यक्ष खेळू वाजे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये तटकरे यांच्या परिवारवादी राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका केली.

काँग्रेस पक्षाचा हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करण्यासाठीच असल्याचे पदाधिकारी यांच्या भाषणातून स्पष्ट होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला श्रीवर्धन मतदार संघ सोडल्यास काँग्रेस बंडखोरी करणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुनील तटकरेच्या व पक्षाच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या