खिचडीच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेणाऱ्या शिक्षकास अटक

33
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, भोकर

शालेय पोषण आहार अंतर्गत शिजवलेल्या खिचडीच्या कामाचे बिल ऑनलाइन भरण्यासाठी १८०० रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला अटक झाल्याची घटना २९ जून रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली.

जिल्हा परिषद अंतर्गत शहरातील नवी अबादी, दसऱ्याच्या मारोती मंदिर शेजारच्या प्राथमिक शाळेतील सहशिक्षक गणेश साहेबराव जाधव, रा.पवार कॉलनी भोकर यांनी शाळेत शालेय पोषण आहाराअंतर्गत शिजवल्या जाणाऱ्या खिचडीच्या कामाची माहिती दररोज ऑनलाइन भरून पाठवण्यासाठी खिचडी बनवणाऱ्या महिलेस १८०० रुपयांची मागणी केली असता महिलेच्या पतीने या कामी पैसे द्यायचे काय याबाबत पंचायत समिती व इतर खिचडी शिजवणाऱ्याशी संपर्क साधला असता असे कोणतेही पैसे देण्याची गरज नसल्याची माहिती मिळाली.

शिक्षकाकडून या पैशांबाबत वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून २५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडकडे याबाबत तक्रार केली असता तक्रारीची शहानिशा करून दि.२९ जून रोजी सकाळी ११ वाजता पंचासमक्ष शाळेत सापळा रचून ठरल्याप्रमाणे १८००  रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षक गणेश जाधव यांना रंगेहात पकडून जेरबंद करण्यात आले. कलम ७,१३ (१) (ड) सह १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शालेय पोषण आहारच्या बिलाकरीता अशा अनेक बाबीसाठी पैशाची सर्रास लुट संबधिताकडून होत असल्याच्या अनेक तक्रारी असून या कारवाईमुळे संबंधितातून समाधान व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या