
सामना प्रतिनिधी, मुंबई
गेल्या सोमवारपासून राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन आता चिघळले आहे. अनुदानाची मागणी करणाऱया या शिक्षकांशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री, अर्थमंत्री व शिक्षणमंत्र्यांना केळच नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘करो या मरो’ची लढाई लढणाऱया या शिक्षकांनी बुधवारपासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे गेल्या 18 वर्षांपासून लटकलेल्या अनुदानाच्या मागणीसाठी 19 नोव्हेंबरपासून राज्यभरातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करीत आहेत. मात्र या शिक्षकांची सरकारने क्रूर चेष्टाच चालविली आहे. आठवडा उलटला तरी या शिक्षकांशी बैठक घेण्यास सरकारला वेळ नाही. गेल्या सोमवारी शिक्षणमंत्र्यांनी शिष्टमंडळाला गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे सांगितले तसेच त्याचवेळी आपला प्रश्न सोडवण्यात येईल, असे जाहीरही केले; मात्र काहीच झाले नाही तर गुरुकारी सभागृहात तसेच शिष्टमंडळाला बोलाकून ही बैठक सोमवारी दुपारी होईल, असे जाहीर केले. मात्र आता ही बैठक पुन्हा उद्या होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे शिक्षकवर्गात संतापाची लाट उसळली असल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
शिक्षकांचा अंत पाहू नका
मंगळवारी (27 नोव्हेंबर) ला बैठक न झाल्यास शेकडो शिक्षक, संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षण परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, खंडेराव जगदाळे बुधवारपासून आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. अनुदानाची मागणी मान्य न झाल्यास शिक्षकांनी शेतकऱ्यांसारखी आत्महत्या केल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर यांनी दिला आहे.
























































