१७ जुलैपासून बारावीचे भाषेचे शिक्षक प्रशिक्षणावर

सामना प्रतिनिधी । मुंबई

फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेपासून बारावीच्या भाषा विषयांसाठी प्रश्नपत्रिका नव्हे तर कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायची आहे. मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलगू, सिंधी आणि संस्कृत या नऊ भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका लागू असणार असून या कृतिपत्रिकेचे मूल्यमापन कसे करायचे याचे धडे शिक्षकांना देण्यासाठी १७ ते २० जुलै असे पाच दिवस वर्ग सोडून भाषेचे शिक्षक प्रशिक्षणावर असणार आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाच्या वतीने १७ ते २० जुलै या काळात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पूर्वीच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे रूपांतर कृतिपत्रिकेत करण्यात आले आहे. उताऱयावरील प्रश्न, वर्णनात्मक लेखन, पत्रलेखन असे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे प्रश्न कृतिपत्रिकेत विचारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तराला गुण कसे द्यायचे याविषयीची माहिती या प्रशिक्षणातून शिक्षकांना देण्यात येणार आहे.

जूनमध्ये प्रशिक्षण व्हायला हवे होते
कृतिपत्रिकांच्या मूल्यमापनाचे प्रशिक्षण जूनमध्ये व्हायला हवे होते अशी प्रतिक्रिया ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली. मे महिन्यात निवड आणि वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रशिक्षण असल्याने हे कृतिपत्रिका मूल्यमापनाचे प्रशिक्षण होऊ शकले नाही. मात्र जूनमध्ये कॉलेज सुरू होण्याआधी तरी हे प्रशिक्षण व्हायला हवे होते. आता अभ्यासक्रम सुरू असताना शिक्षकांना वर्गात असण्याऐवजी पाच दिवस प्रशिक्षणाला हजेरी लावावी लागणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.