
सामना प्रतिनिधी । मुंबई
पहिली ते बारावीपर्यंत शिक्षक भरती गुणवत्ता व पारदर्शकपणे होण्यासाठी ‘पवित्र’ या वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली असून या पोर्टलद्वारे राज्यभरात केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती होणार आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पवित्र पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले असून अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि टीईटीपात्र उमेदवारांना या पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
यापूर्वी खासगी शाळा, समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत येणाऱया शाळांमध्ये शिक्षक भरती त्या त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता ‘पवित्र’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. सर्व विभागांनी शिक्षक पदाच्या रिक्त जागांचा तपशील ‘पवित्र’ या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रात जाहिरातही द्यायची आहे, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
-अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) मध्ये शून्य पेक्षा अधिक गुण तसेच टीईटीमध्ये पात्र असलेले उमेदवार पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात.
-नववी ते बारावीच्या शिक्षक पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) मध्ये ‘शून्य’ पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
-अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.edustaff.maharashtra.gov.in/pavitra या वेबसाइटवर नोंदणी करायची आहे.
-नोंदणीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा आसन क्रमांक हाच उमेदवाराचा User Id असेल.
























































