
केंद्र सरकारने देशभरातील शिक्षकांना खूशखबर दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्राच्या सात वर्षांच्या वैधतेची अट रद्द करण्यात आली असून एकदा परीक्षेत पात्र ठरल्यानंतर मिळणारे टीईटी पात्रता प्रमाणपत्र कायमच वैध राहणार आहे.
आधीच्या नियमानुसार टीईटी प्रमाणपत्राच्या वैधतेची मुदत सात वर्षांपर्यंत होती. सात वर्षांपर्यंतच उमेदवार शिक्षकपदाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत होते. त्यामुळे पात्रता प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर पुन्हा टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. मात्र आता हे टेन्शन संपले आहे.
नव्या नियमानुसार उमेदवार टीईटी परीक्षा एकदा पास झाला की टीईटी प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी या निर्णयाची घोषणा केली. सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकपदी नोकरी करण्यासाठी टीईटी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. जे शिक्षक शाळांवर नियुक्त आहेत त्यांनादेखील ही परीक्षा पास असणे सक्तीचे करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांनी वर्ष 2011 मध्ये टीईटी परीक्षा पास केली आहे त्यांचे प्रमाणपत्र यापुढेही कायमस्वरूपी वैध राहणार आहे.
































































