
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक भारतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष, आमदार ज.मो. अभ्यंकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेत जाहीर प्रवेश केला. सोलापूर जिह्यातील शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी आणि शिक्षकांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिक्षक सेनेत प्रवेश केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मुंबई येथील शिक्षक सेनेच्या राज्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सोलापूर शिक्षक भारतीचे प्रवत्ते विजयकुमार गुंड यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी शिक्षक सेनेत प्रवेश केला. या वेळी आमदार अभ्यंकर यांनी विधान परिषदेत शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे राज्यभरातील शिक्षकांना न्याय व दिलासा मिळत असल्याचे नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱयांनी सांगितले. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार सोलापूर शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण संचालक स्तरावर बैठका घेऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन या वेळी ज.मो. अभ्यंकर यांनी दिले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, राज्य सचिव रमेश चौगुले, प्रकाश शेळके, राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, विधी विभाग अध्यक्ष मच्छिंद्र खरात, मुंबई सरचिटणीस मुरलीधर मोरे, जुनिअर कॉलेज सरचिटणीस मंगेश पाटील, मुंबई उपाध्यक्ष विजय गवांदे, अशोक पाटील, प्रभाकर भोईटे, केरबा सरक, उत्तम चव्हाण, नाना राजगे, संतोष शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.





























































