IND VS BAN टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच, बांगलादेशवर मिळवला दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुवारी टीम इंडियाने बांगलादेशी वाघांची शिकार केली. पुण्यात पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. सात गडी व 50 चेंडू राखून टीम इंडियाने विजय मिळवला. विराट कोहलीचे शतक व शुभमन गिलचे अर्धशत, रोहीत शर्माच्या 48 धावांच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशने दिलेले लक्ष्य 41 षटकात पार केले. विराट कोहलीचे हे 48 वे शतक असून सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांच्या रेकॉर्डपासून तो केवळ एक शतक दूर आहे.

बांगलादेशने दिलेले 257 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे सलामीवीर कर्णधार रोहीत शर्मा व शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. रोहीत शर्माने 48 धावा व शुभमन गिलने 53 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने 97 चेंडूत 103 धावा करत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचवलं. यात के.एल राहुल याच्या 34 धावांचाही मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीचे हे एकदिवसीय फॉरमॅटमधील 48 वे शतक आहे.

पहिल्या सत्रात बांगलादेशने अगदी धड़ाकेबाज फलंदाजीला सुरुवात केली. 14 फटकात 93 धावा झालेल्या असताना कुलदीप यादवने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर आलेला नाजमूल शांटो अवघ्या 8 धावा तर मेहीदी मिराज हा 3 धावा करून तंबूत परतले. मात्र सलामीवीर लिट्टन दास हा एका बाजूने संघाची कमान सांभाळत होता. मात्र 27 व्या षटकात 66 धावांवर असताना जाडेजाने दासची विकेट घेतली. त्यानंतर एक एक करत बांगलादेशच्या आठ विकेट पडल्या. यात मोहम्मद सिराज, जसप्रित बुमराह, रविंद्र जाडेजा यांना प्रत्येकी 2 तर शार्दुल ठाकूर,कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हार्दीक पांड्याला दुखापत

सामन्याच्या 9 व्या षटकात हिंदुस्थानी संघासाठी चिंता वाढवणारी घटना घडली. फलंदाजाने मारलेला फटका अडवताना हार्दिकचा पाय मुरगळला. यामुळे हार्दिकला नीट चालताही येत नव्हतं. त्याने त्याही परिस्थिती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ते जमत नव्हतं. अखेर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. जेव्हा हार्दिक पांड्या मैदानाबाहेर गेला तेव्हात्याचे 3 चेंडू शिल्लक होते. अखेर त्याचे षटक संपवण्यासाठी विराट कोहलीला बोलावण्यात आलं.