
फलंदाजीमध्ये हिंदुस्थानचा दुसरा डाव 174 धावांत गडगडला खरा, पण दक्षिण आफ्रिकेच्याही दुसऱया डावाला खिंडार पाडून हिंदुस्थानने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पुन्हा वर्चस्व निर्माण केले. हिंदुस्थानकडून मिळालेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाची उर्वरित 40.5 षटकांच्या खेळात 4 बाद 94 अशी दुर्दशा झाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवर व कर्णधार डीन एल्गार 52 धावांवर खेळत होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजून 211 धावांनी पिछाडीवर असून हिंदुस्थानला विजयासाठी 6 विकेटची गरज आहे. त्याआधी हिंदुस्थानने तिसऱया दिवसाच्या 1 बाद 16 धावसंख्येवरून बुधवारी पुढे खेळायला सुरुवात केली. मंगळवारी ‘रात्रीचा रखवालदार’ म्हणून खेळायला आलेल्या शार्दुल ठाकूरला (10) कॅगिसो रबाडाने लवकर बाद करून करून इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. मग पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुलली (23) बाद झाला.
कोहली–पुजाराकडून पुन्हा निराशा
पहिल्या डावात 35 धावांची खेळी करणारा कर्णधार विराट कोहली (18) दुसऱया डावातही अपयशी ठरला. मार्को जॅनसनने त्याला यष्टीमागे डी कॉककरवी झेलबाद केले. मग कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारानेही (16) पुन्हा निराशा केली. त्याला एन्गिडीने यष्टीमागे झेलबाद करून हिंदुस्थानला चौथा धक्का दिला. आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर अनुभवी अजिंक्य रहाणेने खेळपट्टीवर उभे राहणे अपेक्षित होते, मात्र जॅनसनने त्याला 20 धावांवर डय़ुसेनकरवी झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेला सहावे यश मिळवून दिले.
कर्णधार एल्गारची झुंज
हिंदुस्थानकडून मिळालेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची निराशाजनक सुरुवात झाली. मोहम्मद शमीने दुसऱयाच षटकात एडन मार्करमचा (1) त्रिफळा उडवून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर डीन एल्गार व किगन पीटरसन (17) यांनी 33 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात मोहम्मद सिराजने पीटरसनला यष्टीमागे झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने रॅस्सी वॅन दर डुसेन (11) व ‘रात्रीचा रखवालदार’ म्हणून आलेला केशव महाराज (8) यांचे त्रिफळे उडवून दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले.
पंतची फटकेबाजी
हिंदुस्थानचा डाव 6 बाद 111 असा संकटात असताना आलेल्या रिषभ पंतने कसोटी स्टाइलमध्ये न खेळता आपली नैसर्गिक फलंदाजी करणे पसंत केले. त्याने रविचंद्रन अश्विनच्या साथीत सातव्या विकेटसाठी ताबडतोब 35 धावांची भागीदारी केली. रबाडाने अश्विनला 14 धावांवर बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर 34 चेंडूंत 6 चौकारांसह 34 धावा करणाऱया पंतलाही रबाडाने बाद करून हिंदुस्थानच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली. त्यानंतर हिंदुस्थानचा डाव संपायला वेळ लागला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कॅगिसो रबाडा व मार्को जॅनसन यांनी 4-4 फलंदाज बाद केले. लुंगी एन्गिडीने 2 बळी टिपले.





























































