
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. मात्र, तरीही त्याला अद्याप टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. याच दरम्यान त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. आता त्याने त्याबद्दमल मोठे विधान केले आहे.
मोहम्मद शमीने 2025-26 च्या घरगुती हंगामात बंगालसाठी 67 बळी घेऊनही अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, शमीने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत त्याला क्रिकेटचा कंटाळा येत नाही, तोपर्यंत तो खेळत राहील. “ज्या दिवशी मला खेळाचा कंटाळा येईल किंवा आळस जाणवेल, त्याच दिवशी मी निवृत्ती घेईन,” असे त्याने ‘द शुभंकर मिश्रा शो’मध्ये सांगितले.
टीम इंडियाने 2025 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद पटकावलं. त्यानंतर शमी हिंदुस्थानी संघातून बाहेर आहे. दुखापतींमधून सावरल्यानंतरही त्याला दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि टी-20 विश्वचषकासाठी डावलण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शमीने आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे आणि खेळाचा आनंद घेत असल्याचे त्याने नमूद केले.
आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खराब कामगिरी केल्यानंतर, शमीला संघाने मुक्त केले होते. आता आयपीएल 2026 साठी तो लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघात सामील झाला आहे. लखनऊने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण 100 टक्के प्रयत्न करू आणि आपल्या लयीवर लक्ष केंद्रित करू, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.



























































