टीम इंडियाच्या सरावाला प्रदूषणाचा फटका; नवी दिल्लीतील वातावरण ठरतेय मारक

हिंदुस्थानबांगलादेश यांच्यामध्ये येत्या 3 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. पण या सामन्यावर नवी दिल्लीतील वायुप्रदूषणाचा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र लढत डेनाइटहोणार असल्यामुळे यावर तितकासा परिणाम होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले असले तरी खेळाडूंच्या सरावावर मात्र फरक पडणार आहे. सकाळच्या सत्रात खेळाडूंना प्रदूषणाचा फटका बसू शकतो.

हिंदुस्थानचा संघ 31 ऑक्टोबरला नवी दिल्लीत पोहचणार आहे. त्यानंतर 1 2 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचे सराव सेशन होणार आहे. प्रदूषणाकडे लक्ष ठेवून संघव्यवस्थापनाने दुपारी 2 ते 5 या वेळेत सराव करण्याचे ठरवले आहे. मात्र शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांमध्ये वातावरण कसे असते यावरही सरावाचे सत्र ठरवण्यात येणार आहे अशी माहिती पुढे देण्यात आली.

दिल्ली शहरात खराब वातावरण हा चिंतेचा विषय बनला आहे. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) खराब दिसत होता. सूत्रांच्या माहितीनुसार मागील गुरुवारी दिल्ली विद्यापीठाचा एक्यूआय 357 होता. हा एक्यूआय अतिशय खराब मानला जातो. खराब वायुप्रदूषणावर आमचे नियंत्रण नाही आणि सामना दिवाळीच्या एक आठवडय़ानंतर असता तर तेव्हापर्यंत स्थिती नियंत्रणात आली असती. आम्हाला दिवाळीनंतर दिल्लीच्या प्रदूषणाची कल्पना आहे, पण सामना एक आठवडय़ानंतर हवा होता, असे बीसीसीआयच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.

तर फिटनेसचा सराव जिममध्ये करणार

प्रदूषणामुळे नेटमध्ये सराव करायला मिळाला नाही तर टीम इंडियाचे खेळाडू जिममध्ये फिटनेससाठी सराव करतील, असे सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले. तसेच आगामी दिवसांमध्ये नवी दिल्लीत सूर्य तळपल्यास सरावावर परिणाम होणार नाही. खेळाडूंना पूर्ण सराव करता येणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या