
हिंदुस्थानी क्रिकेट संघ गेल्या 21 वर्षांमधील 100वा कसोटी विजय मिळवण्याच्या उंबरठय़ावर उभा आहे. 2001 सालापासून आतपर्यंत झालेल्या कसोटींच्या 99 लढतींमध्ये विजय मिळवण्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. आता 18 जूनपासून साऊथम्पटन येथे होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारून विराट कोहलीची सेना ‘शतकी कसोटी विजय’ साजरा करण्यासाठी आतुर झाली आहे. गेल्या 21 वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोनच संघांनी कसोटी क्रिकेटमध्ये 100पेक्षा जास्त विजय मिळवले आहेत. हिंदुस्थानने न्यूझीलंडला हरवल्यास अशी कामगिरी करणारा तिसराच संघ ठरणार आहे.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ठरलेत सरस
2001 सालापासून नव्या शतकाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 21 वर्षांच्या कालावधीत 100पेक्षा जास्त कसोटी विजय दोनच संघांनी मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने 224 कसोटी सामने खेळून 130मध्ये विजयाला गवसणी घातली आहे. 58 कसोटींमध्ये त्यांना हार सहन करावी लागली आहे. 36 कसोटी ड्रॉ राहिल्या आहेत. इंग्लंड संघाने आतापर्यंत 258 कसोटी सामने खेळले आहेत. 155 कसोटींमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे. या कालावधीत इंग्लंडला 85 कसोटींमध्ये हार सहन करावी लागली आहे.
या कर्णधारांच्या मार्गदर्शनाखाली ‘जय’
2001 सालापासून टीम इंडियाने सौरभ गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात विजय मिळवले आहेत. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 19, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 27, विराट कोहलीच्या नेतृत्वात 36, राहुल द्रविडच्या नेतृत्वात 8, अनिल कुंबळेच्या नेतृत्वात 3, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात 4 व वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात दोन विजय मिळवले आहेत. तसेच या कालावधीत परदेशात 39 कसोटी विजय मिळवण्याचा करिष्मा हिंदुस्थानी संघाने करून दाखवला आहे.
हिंदुस्थानने 2001 सालापासून मिळवलेले विजय
- ऑस्ट्रेलिया – 19
- इंग्लंड – 15
- वेस्ट इंडीज – 15
- श्रीलंका – 13
- दक्षिण आफ्रिका – 12
- बांगलादेश – 8
- न्यूझीलंड – 7
- झिम्बाब्वे – 5
- पाकिस्तान – 4
- अफगाणिस्तान – 1





























































