
भुयारी मेट्रो मार्गिकेवरील सिद्धिविनायक स्थानकात मंगळवारी सकाळी एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ऐन गर्दीच्या वेळेस कफ परेडच्या दिशेकडील सेवा ठप्प झाली. जवळपास दहा मिनिटे गाडी स्थानकातच उभी राहिल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बिघाड दुरुस्त केल्यानंतर ट्रेन मार्गस्थ झाली. मात्र मागील सर्व ट्रेनचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. गेल्या महिन्यात सांताक्रुझजवळ मेट्रो ट्रेनमध्ये शॉर्टसर्किट झाले होते.
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड अशा संपूर्ण मार्गिकेवर भुयारी मेट्रोची सेवा गेल्या महिन्यात सुरू करण्यात आली. या मार्गिकेवर नियमित प्रवाशांची संख्या सवा लाखाच्या पुढे गेली आहे. रोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, कफ परेडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक असते. याच लाईनवर मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड लक्षात येताच प्रभादेवीतील सिद्धिविनायक मेट्रो स्थानकातच उभी करून ठेवण्यात आली. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) तंत्रज्ञांच्या पथकाने तातडीने धाव घेतली आणि ट्रेनमधील बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जवळपास 10 मिनिटे ट्रेन एकाच जागी थांबली. त्या ट्रेनबरोबरच मागून धावणाऱ्या इतर ट्रेनची सेवा दहा मिनिटांसाठी ठप्प झाली.
मोदींच्या दौऱयाआधीही झाला होता बिघाड
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात सांताक्रुझ स्थानकाजवळ एका मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. ट्रेनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रवाशांना खाली उतरवून ट्रेन दुरुस्तीसाठी रवाना केली होती. वरळी ते कफ परेड या भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांच्या दौऱ्याआधी ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.
देखभालीचा प्रश्न
भुयारी मेट्रोच्या ट्रेन, सरकते जिने (एस्केलेटर), लिफ्ट, स्थानकातील स्वयंचलित गेटच्या देखभालीबाबत प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. या मेट्रो प्रकल्पावर तब्बल 37,276 कोटी रुपये खर्च केले आहेत. असे असताना विविध सुविधा नीट कार्यान्वित झालेल्या नाहीत. अनेकदा प्लॅटफॉर्मला लागून असलेले स्वयंचलित दरवाजे अर्धवट उघडतात. त्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत ट्रेनमधून बाहेर पडणे मुश्कील होत आहे.





























































