तंत्रस्नेही शिक्षकांची सिंधुदुर्ग शैक्षणिक चळवळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

सोशल मिडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता त्याचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास व्हावा. तसेच शिक्षणाचे बाजारीकरण थांबावे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच १८ प्राथमिक शिक्षकांनी ‘तंत्रस्नेही’ बनत सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येत “सिंधुदुर्ग शैक्षणिक चळवळ” सुरु केली आहे. विद्यार्थी केंद्रित सुरु केलेल्या चळवळीतून ‘शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास माहिती” या तयार केलेल्या पहिल्या पुस्तिकेचे प्रकाशन गुरुवारी शिक्षण समिती सभेत सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्याहस्ते करण्यात आले.

ही पुस्तिका १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ हजार शाळांना हि पुस्तिका मोफत दिली जाणार आहे. तसेच लवकरच ६ वी व ७ वीचा अभ्यासक्रम, व्हिडीओ अभ्यासक्रम आणि शैक्षणिक अॅप निर्मितिवर काम करणार असल्याचे उत्तम पाटील, शुभांगी रणदिवे, प्रल्हाद गायकवाड, हेमलता जाधव, संपदा बागी आदी आठ तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.

शिक्षण समितीची मासिक सभा गुरुवारी येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सदस्य सरोज परब, विष्णुदास कुबल, सुनिल म्हापनकर, राजेंद्र म्हापसेकर, संपदा देसाई, गट शिक्षणाधिकारी आदि उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची शैक्षणिक गुणवता वाढवी तसेच त्याचा विकास व्हावा आणि विविध कंपन्याच्या माध्यमातून सुरु असलेले शिक्षणाचे बाजारीकरण थांबावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनीच प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी १८ शिक्षक सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येत त्यांनी सिंधुदुर्ग शैक्षणिक चळवळ सुरु केली आहे. त्यांनी विद्यार्थी सोशल मिडियावर विनाकारण वाया घालत असलेला वेळ शैक्षणिक कामाकडे कसा वळविता येईल यासाठी प्रयत्न २ ऑक्टोंबर २०१८ला सुरु केले. विद्यार्थी हा केंद्र बिंदू समोर ठेवून गुणवत्ता वाढीस मदत करणारे प्रश्न, विचार आदींची त्यांनी सोशल मिडियाद्वारे देवाण-घेवाण करण्यास सुरुवात केली. त्यांनंतर त्यांनी १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी ” सिंधुदुर्ग शैक्षणिक चळवळ गुणवत्ता वाढ व विकास माहिती पुस्तिका” तयार केली आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंनददायी शिक्षण घेता येणार आहे. तसेच ही पुस्तिका जिल्ह्यातील १ हजार शाळांना मोफत दिली जाणार असल्याचे उपस्थित शिक्षकांनी स्पष्ट केले.

लवकरच व्हिडीओ अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार
१ ते ५ वीच्या विद्यर्थ्यांसाठी हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता ६ वी व ७ वी च्या अभ्यासक्रमांसाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. तसेच लवकरच व्हिडीओ अभ्याक्रम आणि अॅप निर्मितीसाठी आपले प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपस्थित शिक्षकांनी दिली.

शिक्षक भरती संदर्भात तब्बल ५२ वेळा माहिती सादर
शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक संख्या, सेवानिवृत्त होणारे शिक्षक, आंतरजिल्हा बदली, आरक्षण आदिंसह माहिती भरण्यात येत आहे. मात्र ही माहिती भरताना शासनाकडून काही बदल होत आहेत. त्यामुळे नव्याने माहिती सादर करावी लागते. त्यानुसार आपण तब्बल ५२ वेळा ही माहिती शासनाला सादर केली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सभेत दिली. मात्र एवढ्या वेळा माहिती सादर करूनही शिक्षक भरती जाहीर का होत नाही असा प्रश्नही सदस्यांनी सभागृहात उपस्थित केला.